चुकीचे अन्न ग्रहण केल्यास मनुष्य चुकीच्या मार्गावर जाईल ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – जर तुम्ही चुकीचे अन्न ग्रहण केले, तर ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. कुणीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये. तामसिक अन्नात मांसाहाराचा समावेश असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. भारत विकास परिषदेच्या पश्‍चिम क्षेत्राच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात २९ सप्टेंबर या दिवशी ही बैठक पार पडली.

पाश्‍चिमात्य देश आणि भारत येथील मांसाहार करणार्‍यांची तुलना करतांना डॉ. भागवत म्हणाले, ‘‘जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही अनेक लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात; पण भारतात मांसाहार करणारे संयम पाळतात आणि काही नियमांचे पालन करतात. मानवी जीवनाचे सत्य शोधण्यासाठी विज्ञान अजूनही चाचपडत आहे. देशातील लोक श्रावणामध्ये मांसाहार खाणे टाळतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ते मांसाहार करत नाहीत. त्यांनी स्वत:साठी काही नियम आखले आहेत.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय नागरिक सर्वांनाच आपले मानतो. त्यामुळेच आपण श्रीलंका आणि मालदीव देशांना त्यांच्या अडचणीच्या काळात साहाय्य करतो. युक्रेन युद्धामध्ये अडकलेल्या भारतियांसमवेतच इतर देशातील लोकांची आपण सुटका करतो.’’