येत्या आठवडाभरात ‘पी.एफ्.आय.’वर बंदीची शक्यता !

  • पी.एफ्.आय. स्वतःवरील कारवाईचा सूड उगवण्याच्या सिद्धतेत

  • आत्मघाती आक्रमण करण्याची शक्यता

थिरूवनंतपूरम् (केरळ) – देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (‘पी.एफ्.आय.’वर)  धाडसत्र चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर (‘पी.एफ्.आय.’वर) येत्या आठवड्याभरात बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईच्या विरोधात ‘पी.एफ्.आय.’कडून देशभरात हिंसाचार घवडण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची सिद्धता करण्याचे आणि कृती करण्याचे निर्देश त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत, असे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने मुंबईमध्ये ‘पी.एफ्.आय.’च्या एका कार्यकर्त्याकडून एक पुस्तिका जप्त केली होती. यामध्ये देशभरात आतंकवादी कारवायांसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती उघड झाली होती. तसेच सरकारी यंत्रणा, भाजप आणि रा.स्व. संघाचे नेते यांना लक्ष्य करण्याची योजना समोर आली होती. ‘पी.एफ्.आय.’च्या नेत्यांना केलेल्या अटकेच्या विरोधात सूड उगवण्याचे ठरवण्यात आल्याचेही या पुस्तिकेत म्हटले होते. यात ‘बयाथीस’ अशा शब्दाचा यासाठी वापर करण्यात आला आहे. ‘बयाथीस’ हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ आहे ‘मृत्यूचा सौदागर’ किंवा आत्मघात. यामध्ये एखाद्याला मारण्याची किंवा मरण्याची शपथ घेतली जाते.

संपादकीय भूमिका

अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईनंतरही पी.एफ्.आय. आक्रमण करण्याची सिद्धता करते, यावरून तिची सिद्धता किती आहे, हे लक्षात येते ! इतके होईपर्यंत तिच्यावर कारवाई न होणे लज्जास्पद !