रशिया-युक्रेन युद्धात भारत शांततेच्या बाजूने ! – भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिपादन

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

न्यूयॉर्क (अमेरिका) – रशिया-युक्रेन युद्ध मुत्सदेगिरीच्या आधारे संपवण्यात यावे. ‘या युद्धात भारत कुणाच्या बाजूने आहे ?’ असे आम्हाला नेहमी विचारले जाते. यावर आमचे एकच थेट आणि प्रामाणिक उत्तर आहे. भारत शांततेच्या बाजूने असून यावर नेहमी ठाम रहाणार आहे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले.

१. एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आणि अधिकार यांच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेनमधील युद्ध संवादाच्या माध्यमांतून सोडवणार्‍यांच्या बाजूने भारत आहे. रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक  आहेत. या प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रे आणि बाहेरील देशांमध्ये रचनात्मक कार्य आवश्यक आहे.

२. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत २४ सप्टेंबरला केलेल्या भाषणात जगातील महागाईवर बोट ठेवले. युक्रेनमधील संघर्षामुळे अन्न आणि इंधन महाग झाल्याचे मत जयशंकर यांनी व्यक्त केले. भारताने अलीकडच्या काही वर्षांत अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका, येमेन आणि अन्य देशांना अन्नधान्याचा पुरवठा केल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. या प्रसंगी जयशंकर यांनी चीनविरोधात अप्रत्यक्ष निशाणा साधला. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी साजिद मीर याला आतंकवाद्यांच्या काळ्या सूचीमध्ये टाकण्याचा अमेरिका आणि भारत यांचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रोखला होता. याविषयीही जयशंकर यांनी चीनची कानउघाडणी केली.