पश्‍चिमी देशांचा सामना करण्यासाठी रशिया ३ लाख सैनिकांची करणार भरती !

रशिया-युक्रेन युद्ध

पुतिन यांनी परमाणू आक्रमण करण्याची दिली चेतावणी !

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन ७ मास उलटले असले, तरी अमेरिकेसहित पश्‍चिमी देश रशियाच्या आक्रमकतेला लगाम घारण्यात अपयशी ठरले आहेत. रशियाच्या कह्यात असलेल्या युक्रेनमधील अनेक शहरांवर युक्रेनने पुन्हा नियंत्रण मिळवण्यास आरंभ केल्याच्या बातम्यांना चुकीचे ठरवत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ३ लाख सैनिकांची भरती करण्यात येईल, असेही ते म्हणाले आहेत. यामुळे पश्‍चिमी शक्तींची चिंता वाढली आहे, असे म्हटले जात आहे.

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे २० लाख सैनिकांच्या आंशिक एकत्रीकरणामुळे देशाचे सामर्थ्य वाढणार आहे. सैन्याचे ‘आंशिक एकत्रीकरण’ म्हणजे काही ठरावीक वयोगट किंवा सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांचे एकत्रीकरण होय. या निर्णयाच्या अंतर्गत रशियन नागरिकांनाही युद्धामध्ये प्रत्यक्ष योगदान द्यावे लागणार आहे. ज्या नागरिकांनी सैनिकी प्रशिक्षण घेतलेले आहे, तसेच त्याचा अनुभव आहे, त्यांना पुन्हा सैन्यामध्ये सहभागी करून घेण्यात येईल. याने रशियन सैन्याची शक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

२. रशियाने २३ ते २७ सप्टेंबरपासून त्याच्या नियंत्रणात असलेल्या लुहान्स्क, डोनेट्स्क, खेरसॉन आणि जापोरिज्जिया प्रांतांमध्ये जनमत संग्रह करणार असल्याची घोषणा केली आहे. हे प्रांत युक्रेनच्या एकूण भूमीपैकी १५ टक्के आहे. यामुळेही पश्‍चिमी शक्तींची चिंता वाढली आहे.

काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष पुतिन ?

व्लादिमिर पुतिन यांनी रशियन नागरिकांना संबोधित करतांना म्हटले की, मातृभूमी, सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्व यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी मी रशियन सैन्याने केलेल्या आंशिक एकत्रीकरणाच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. रशियन लोकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते.

ते पुढे म्हणाले की, जर क्षेत्रीय अखंडतेवर संकट निर्माण झाले, तर रशिया त्याच्याकडील सर्व साधनसंपत्तीचा उपयोग करील. पश्‍चिमी शक्तींच्या संभाव्य परमाणू आक्रमणावर ते म्हणाले की, रशियाकडे ‘पश्‍चिमी संकटां’चा सामना करण्यासाठी पुष्कळ शस्त्रास्त्रे आहेत.