चंडीगड विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या व्हिडिओच्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक

वसतीगृहाच्या प्रमुखांना हटवले !

चंडीगड – पंजाबच्या मोहाली येथील चंडीगड विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या अंघोळीचा व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या प्रकरणी वसतीगृहातील सर्व प्रमुखांना हटवण्यात आले असून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थिनीने हे व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी पाठवले होते तिला आणि तिच्या सनी मेहता अन् रंकज वर्मा या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या तणावाचे वातावरण पहाता आठवडाभर विद्यापीठ बंद ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापिठाने ५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

या प्रकरणी ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असे सांगण्यात आले होते; मात्र  विद्यापीठ व्यवस्थापन आणि पोलीस यांनी ‘ही अफवा आहे’, असे म्हटले आहे. अटक करण्यात आलेला सनी (वय २३ वर्षे) हा बेकरीमध्ये काम करतो, तर रंकज (वय ३१ वर्षे) ट्रॅव्हल एजन्सीत काम करतो. ‘व्हिडिओ मागवून तो प्रसारित करण्यामागचा हेतू काय होता ?’, याविषयी चौकशी केली जात आहे.