सोनाली फोगाट यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावे !

  • खाप पंचायतीची हरियाणा सरकारकडे मागणी

  • १६ सप्टेंबरपर्यंतची समयमर्यादा

पणजी – भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांची हत्या केल्याच्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अन्यथा मुंबई उच्च नायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली जाईल, अशी चेतावणी हरियाणातील हिसार येथील खाप महापंचायतीने दिली आहे. ११ सप्टेंबरला याविषयी खाप पंचायतीची  बैठक झाली. यासाठी खाप पंचायतीने शुक्रवार, १६ सप्टेंबरपर्यंतची समयमर्यादा हरियाणा सरकारला दिली आहे. सोनाली फोगाट यांच्या हत्येला १५ दिवस उलटले आहेत. गोवा पोलिसांकडून या प्रकरणी आतापर्यंत सोनालीचा स्वीय साहाय्यक सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे.

‘या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी करावी’, अशी मागणी सोनाली यांच्या कुटुंबियांनी प्रारंभीच केली होती. यासाठी त्यांनी हरियाणाच्या मुख्यंमत्र्यांचीही भेट घेतली होती. सरन्यायाधिशांनाही या प्रकरणी पत्र लिहिल्याचे सोनाली यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

हिसारमधील खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांची मुलगी यशोधरा यांनी गोवा पोलीस करत असलेल्या हत्येच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही, असे तिने म्हटले आहे.