भाविकाला ५० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा तिरुपती देवस्थानाला ग्राहक न्यायालयाचा आदेश

वस्त्रालंकार पूजेसाठी १४ वर्षे भाविकाला वाट पहाण्यास लावली !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – एका भाविकाला विशेष पूजेसाठी १४ वर्षे वाट पहायला लावल्याच्या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने या भाविकाला ५० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश तिरुमला तिरुपती देवस्थानला दिला. तसेच ‘या भाविकाला वस्त्रालंकार सेवेसाठी वर्षभरात नवा दिनांक देण्यात यावा’, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार प्रविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. के.आर्. हरि भास्कर असे या तक्रारदार भाविकाचे नाव आहे.

१. भास्कर यांनी वर्ष २००६ मध्ये १२ सहस्र २५० इतकी रक्कम भरून वस्त्रालंकार पूजेसाठी नोंदणी केली होती. ही रक्कम आता व्याजासह परत देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

२. कोरोना महामारीच्या काळात मार्च २०२० पासून तिरुमला तिरुपती मंदिर ८० दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मंदिरात होणार्‍या वस्त्रालंकारासह इतर सेवाही थांबवण्यात आल्या होत्या. या वेळी देवस्थानने भास्कर यांना ‘नवा दिनांक हवा कि पैसे परत हवे ?’, असे विचारले होते. त्या वेळी भास्कर यांनी ‘नवा दिनांक मिळावा’, अशी मागणी केली होती; मात्र ते शक्य नसल्याचे देवस्थानने कळवल्यावर भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात देवस्थान समितीच्या विरोधात तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका 

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !