अमेरिकेनंतर आता पोलंडमध्ये अमेरिकी नागरिकाकडून भारतीय वंशाच्या व्यक्तीवर वर्णद्वेषी टीका

वॉर्सा (पोलंड) – अमेरिकेनंतर आता युरोपमधील पोलंड देशात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या विरोधात वर्णद्वेषी टीका केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकी व्यक्ती भारतियाला ‘बांडगूळ’ आणि ‘नरसंहार करणारा’ म्हणतांना दिसून येत आहे. या वेळी या भारतियाने वर्णद्वेषी टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत एकदाही उलटून प्रत्युत्तर दिले नाही. ही घटना केव्हा घडली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच पीडित भारतीय वंशाच्या व्यक्तीचीही ओळख पटली नाही. मागील एका आठवड्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.

१. या व्हिडिओत अमेरिकी व्यक्ती म्हणते की, तू येथे पोलंडमध्ये का रहात आहेस ? तुला काय वाटते, तुम्हाला पोलंड किंवा अन्य कोणत्याही देशांत घुसखोरी करता येईल ? ‘तू येथे कशासाठी आला आहेस ?’ हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या देशाला पुढे नेण्यासाठी काम का करत नाही ? येथे ऐषारामाचे आयुष्य जगत आहात. तुम्हाला आमच्या वंशाला मारायचे आहे का ? आम्हाला संपवायचे आहे का ? तुम्ही बांडगूळ आहात. घुसखोर आहात. ‘भारतियांनी युरोपात रहावे’, अशी आमची इच्छा नाही. तुम्ही पोलिश (पोलंडचे मूळ नागरिक) नाही. पोलंडमध्ये केवळ पोलिश लोकच राहणार. तुम्ही भारतात निघून जा.

२. या वेळी अमेरिकी व्यक्ती घटनेचा व्हिडिआही बनवत होता. भारतियाने त्याला विचारले की, तुम्ही माझा व्हिडिओ का बनवतत आहात ? हे बंद करा.

३. त्यावर अमेरिकी म्हणाला की, हा माझा देश आहे. मी येथे काहीही करू शकतो. माझ्याकडे व्हिडिओ बनवण्याचा अधिकार आहे. अमेरिकेतही पुष्कळ भारतीय आहेत. सर्वत्र भारतीय आहेत. तुम्हा लोकांचा स्वतःचा देश आहे. येथून निघून जा.

संपादकीय भूमिका

अमेरिकी सरकार आणि प्रशासन एरव्ही भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात असल्याची ओरड करतात; मात्र अमेरिकी नागरिक कशा प्रकारे वागतात, याकडे ते दुर्लक्ष करतात, यातून त्याचा दुटप्पीपणा लक्षात येतो ! याविषयी भारत सरकारने अमेरिकेकडे निषेध नोंदवला पाहिजे !