‘श्री योग वेदांत सेवा समिती’च्या वतीने पुणे येथे संयुक्त मूक मोर्चाचे आयोजन

संस्कृती रक्षणाचे अद्वितीय कार्य करणारे संत श्री आसाराम बापू यांना न्याय मिळण्याची मागणी

संत श्री आसाराम बापू

पुणे, २८ ऑगस्ट (वार्ता.) – संत श्री आसाराम बापू यांना एका आंतरराष्ट्रीय षड्यंत्रांतर्गत खोट्या आरोपांच्या आधारे जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या या अन्यायपूर्ण अटकेस ९ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून संपूर्ण भारतात ‘अन्याय दिवस’ या निमित्ताने धरणे प्रदर्शन, आंदोलन आणि शासनास निवेदन दिले जाणार आहे. याच शृंखलेत पुण्यातही श्री योग वेदांत सेवा समिती, पुणे; युवा सेवासंघ, पुणे; महिला उत्थान मंडळ; संस्कृती रक्षक संघ, तसेच भारत जागृती मोर्चा या संघटनांनी आणि त्यांच्या सहस्रो समर्थकांच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी संयुक्त मूक मोर्चा आयोजित केला आहे. मूक मोर्चाचा प्रारंभ शनिवारवाड्यापासून करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने माननीय राष्ट्रपती यांच्यापर्यंतही या संदर्भात निवेदन पाठवले जाणार आहे.

शासनास दिलेल्या निवेदनातील काही सूत्रे

१. श्री आसाराम बापू यांच्यावरील खटला पूर्णपणे बोगस आहे, असे मत सुप्रसिद्ध कायदे पंडितांनीही व्यक्त केले आहे. आरोप करणार्‍या मुलीचा ‘मेडिकल रिपोर्ट’ ही तिच्यावर बलात्कार/विनयभंग झाला नाही, हेच सिद्ध करतात.

२. ज्या हिंदु संतांनी मागील कित्येक दशकांपासून निःस्वार्थपणे समाजसेवा आणि राष्ट्र उत्थानाचे दैवी कार्य आजही अविरतपणे चालू ठेवले आहे, त्यांना मागील ९ वर्षांत त्यांचे ८५ वर्षे वय आणि १३ हून अधिक प्राणघातक व्याधी, तसेच मागील काळात कोरोना आजार झाला असूनही एका दिवसाचा जामीन किंवा पॅरोल देण्यात आला नाही. एकीकडे देशात आतंकवादी आणि राष्ट्रविघातक कृत्य करणार्‍यांच्याही मानवी हक्कांची काळजी घेतली जाते, त्याच देशात संस्कृती संवर्धन-संरक्षणाचे अद्वितीय कार्य करणार्‍या निर्दोष हिंदु संत आसाराम बापूंवर अशा प्रकारचा घोर अन्याय होत आहे.

३. शासन, न्यायालय आणि समाजानेही याची नोंद घ्यावी, तसेच त्यांचे वय, प्रकृती आणि सामाजिक कार्याचा इतिहास यांच्या आधारे तात्पुरता जामीन किंवा पॅरोल, तसेच आवश्यक योग्य उपचार उपलब्ध करून दिले जावेत. माननीय जोधपूर उच्च न्यायालयात त्यांच्या खटल्याची लवकरात लवकर निष्पक्ष आणि पारदर्शक सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा.