महनीय व्यक्तींसाठीच्या दर्शन व्यवस्थेमधून सामान्य भाविकांना मंदिरात सोडल्यामुळे अपघात !

जन्माष्टमीच्या दिवशी मथुरेतील बांकेबिहारी मंदिरात दोघा भाविकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्रकरण

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील बांकेबिहारी मंदिरात श्रीकृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंगला आरतीच्या वेळी मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याविषयी अधिक माहिती आता समोर येत आहे. या मंदिरात अतिमहनीय व्यक्तींना विशेष मार्गाने आत सोडले जाते; मात्र याचा वापर सेवेकरी आणि सुरक्षारक्षकही करत असल्याने दर्शनामध्ये अडथळे निर्माण होतात. यातून अपघात घडतात. जन्माष्टमीच्या दिवशी या मार्गाचा वापर इतरांसाठी करण्यात आल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

१२ वर्षांपूर्वी हा विशेष मार्ग आणि दर्शन व्यवस्था निर्माण करण्यात आली होती; मात्र या मार्गातून महनीय व्यक्तींप्रमाणेच सर्वसाधारण भाविकही महनीय व्यक्ती म्हणून दर्शनासाठी येऊ लागल्या होत्या. यासाठी मंदिर व्यवस्थापनाने १०० रुपये शुल्कही घेण्यास चालू केले होते. त्याचा अपलाभ घेत येथील सेवेकरी त्यांच्या ओळखीच्या लोकांना या व्यवस्थेतून विनाशुल्क मंदिरात प्रवेश देत होते. मंगला आरतीच्या वेळी अशा प्रकारे मोठ्या संख्येने लोकांना दर्शनासाठी आत सोडण्यात आले. त्या वेळी मंदिरात थोडीही जागा नसतांना भाविकांना प्रवेश देण्यात आला. यामुळे तेथे गर्दी झाली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मंदिरात आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव दिसून आला. चौकशी समितीनेही याकडे लक्ष वेधले आहे.