पाकिस्तानने पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर निर्माण केले आतंकवाद्यांचे तळ

  • भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकने नेले होते मागे !

  • जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत !

नवी देहली – पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्यासाठी काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ काही अंतरावर आतंकवाद्यांचे तळ हालवले आहेत. भारताने सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी ते नियंत्रण रेषेजवळच होते; मात्र नंतर ते मागे हालवण्यात आले. आता ते पुन्हा नियंत्रण रेषेजवळ आणण्यात आले आहेत. या तळावर आतंकवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी एकत्र आणण्यात आले आहे. हे आतंकवादी तळ लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिज्बुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनांचे आहेत. सध्या सीमेजवळील सर्व तळे प्रशिक्षित आतंकवाद्यांनी भरलेली आहेत आणि ती थेट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’कडून संचालित केली जात आहेत. पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना पाक सैन्यावर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढवण्याची शक्यता आहे.

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिहादी आतंकवाद्यांकडे भारतात घुसण्याचे अनेक प्रवेश मार्ग आहेत.

२. पाकिस्तानातील पेशावर, बहावलपूर आणि मुझफ्फराबाद येथे मोठ्या संख्येने प्रशिक्षित आतंकवादी आहेत. ते नांगरहार आणि अफगाणिस्तानच्या इतर सीमावर्ती प्रदेशांतून परतले आहेत. त्यांना तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घुसू न दिल्याने ते भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले. आता त्यांना भारतात घुसखोरी करण्यास पाकिस्तानी सैन्य साहाय्य करत आहे.

३. पाकव्याप्त काश्मीरमधील मानशेरा, मुझफ्फराबाद आणि कोटली या भागांमध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, अल्-बदर आणि हरकत-उल्-मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटना कॅम्प चालवत आहेत. मानशेरामधील बालाकोट आणि गढी हबीबुल्ला येथे तळ आहेत. मुझफ्फराबादमध्ये चेलाबंदी, शवाईनाला, अब्दुल्ला बिन मसूद आणि दुलई येथे तळ आहेत. पाकिस्तानी सैन्याचे पाकव्याप्त बिग्रेड सेन्सा, कोटली, गुलपूर, फागोश आणि डुबगी तळांवरील कारवायांविषयी समन्वय साधत आहे. हे तळ प्रामुख्याने सीमेलगत २-३ किलोमीटरमध्ये असलेल्या भारतातील गुरेझ, केल, नीलम व्हॅली, तंगधर, उरी चकोटी, गुलमर्ग, पूँछ, राजौरी, नौशेरा आणि सुंदरबनी या भागांमध्ये घुसखोरी करण्यासाठी उपयोगात आणले जातात.

पाकने ड्रोनच्या साहाय्याने भारतात पाठवली ३०० लहान शस्त्रे !

पाकिस्तानने ड्रोनच्या साहाय्याने जवळपास ३०० लहान शस्त्रे भारतात पाठवली आहेत. अशा वेळी सीमेवरील तळावर गोळा झालेले आतंकवादी भारतात घुसले, तर पाकसाठी ते घातपात करण्यासाठी लाभाचे ठरेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही ३०० लहान  शस्त्रे श्रीनगर आणि आसपासच्या भागांत पोचली आहेत. सध्या श्रीनगर शहरात तोयबा आणि जैशचे अनुमाने ५० परदेशी आतंकवादी आहेत. त्यांना तेथे ठेवण्यात आले असून संधी मिळाल्यावर ते त्यांना सांगण्यात आलेले घातपाती कृत्य करणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारताने आक्रमण झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू नये. त्यातून काही काळापुरता थोडासा परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण पाकलाच धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करावा !
  • या तळांवरून आतंकवाद्यांनी घुसखोरी करण्यापूर्वी भारतानेच या तळांवर आक्रमण करून तेथील आतंकवाद्यांना ठार मारावे !