सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे मालवण येथील कै. अनिल फाटक (वय ७८ वर्षे) !

२६.७.२०२२ या दिवशी मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक अनिल फाटक (वय ७८ वर्षे) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. २६.८.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनाला १ मास पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अनिकेत फाटक याला वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. प्रेमभाव

कै. अनिल फाटक

‘माझे बाबा (कै. अनिल फाटक) साधकांची आस्थेने चौकशी करत असत. साधक घरी आल्यास ते त्यांची सर्व व्यवस्था करत असत. ‘प्रत्येक साधक हे गुरूंचे रूप आहे’, या भावाने ते सर्वांचे आदरातिथ्य करत असत. त्यामुळे बाबा सर्वांना हवेहवेसे वाटायचे.

२. कर्तेपणा न घेणे

श्री. अनिकेत फाटक

आमची आंब्याची बाग आहे. प्रतिवर्षी आंबे काढण्यासाठी तयार झाल्यावर ते पहिली पेटी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. गुरुदेवांसाठी (सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांच्यासाठी) पाठवत असत. पेटी पाठवतांना ते त्यावर स्वतःचे नाव न घालता ‘मालवण केंद्र’ म्हणून पाठवत असत.

३. सेवेची तळमळ असणे

मालवण शहरात सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य आमच्या घरापासून चालू झाले. त्या वेळी ते ‘प्रचार करणे, अर्पण गोळा करणे, विज्ञापने घेणे’, अशा सर्व सेवा करत असत. ‘गुरूंच्या कार्याचा पुष्कळ प्रसार झाला पाहिजे’, अशी त्यांची तळमळ होती.

४. नामजपादी उपाय पूर्ण करणे

बाबा नियमित २ घंटे नामजप करत असत. त्यानंतरच ते स्वतःची वैयक्तिक कामे करायचे.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती बाबांचा भाव

अ. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ बाबा प्रतिदिन न चुकता वाचत असत. ते नातवालाही तो ग्रंथ पहायला सांगून त्याला सांगायचे, ‘‘गुरुदेवांचे दर्शन घे.’’

आ. ते दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचत असत. एखाद्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मिळाले नाही, तर ते अस्वस्थ होत असत आणि दैनिक वाचायला मिळाल्यावरच त्यांचे मन शांत होत असे. दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी त्यांना तळमळ होती.

६. कुलदेवतेचे दर्शन घेतल्यावर घरी येत असतांना बाबांना त्रास होणे आणि तेथेही गुरुकृपेने इतरांनी साहाय्य करणे

२६.७.२०२२ या दिवशी आम्ही कोल्हापूर येथे गेलो होतो. तेथे आमची कुलदेवता श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले आणि काही वेळ आम्ही बसून नामजप केला. घरी येत असतांना त्यांना त्रास होऊ लागला. तेथेही गुरुदेवांच्या कृपेने इतरांनी आम्हाला साहाय्य केले.

७. निधनानंतर

७ अ. वडिलांना पुढची गती मिळाल्याचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगणे : बाबांच्या निधनाच्या दिवशी सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम आम्हाला भेटण्यासाठी घरी आले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘घरात चांगले जाणवत आहे. बाबांना पुढची गती मिळाली आहे.’’

– श्री. अनिकेत फाटक (मुलगा), रेवतळे, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. (१७.८.२०२२)