भाजप ‘आप’चे ४० आमदार फोडण्याच्या प्रयत्नात !  – ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांचा आरोप

‘आप’चे आमदार दिलीप पांडे

नवी देहली – भाजपकडून आम आदमी पक्षाचे ४० आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांनी केला आहे. या संदर्भात आपने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आमदार दिलीप पांडे यांनी सांगितले की, काल संध्याकाळपासून काही आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच सर्व आमदार बैठकीला पोचतील.

१. ‘आप’ने २४ ऑगस्ट या दिवशी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात आपचे नेते संजय सिंह म्हणाले होते की, भाजपने आमच्या आमदारांना प्रस्ताव दिला आहे. ‘आप’ सोडल्यास २० कोटी आणि इतरांना समवेत आणले, तर २५ कोटी देऊ’, असा प्रस्ताव आहे.

२. संजय सिंह यांच्यासमवेत सोमनाथ भारती हेही पत्रकार परिषदेत होते. ते म्हणाले की, भाजपच्या लोकांनी मला सांगितले की ‘आप’चे आणखी २० आमदार आमच्या संपर्कात आहेत.

३. देहली विधानसभेत ७० जागांपैकी ‘आप’ला ६२ आणि भाजपला ८ जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी ३६ आमदारांची आवश्यकता आहे.