आयुक्तांनी ही उधळपट्टी तातडीने थांबवावी ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष

पुणे येथे १५० फिरत्या हौदांसाठी कोट्यवधींची निविदा 

विवेक वेलणकर

पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून फिरत्या विसर्जन हौदांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचे वर्गीकरण करून निविदा प्रक्रिया काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यंदा मात्र कोरोना संसर्गाविषयी कोणतेही निर्बंध नसल्याने वर्ष २०१९ प्रमाणे घाटांवरील हौद, लोखंडी टाक्या, मूर्ती संकलन आणि दान केंद्रांची व्यवस्था कायम असणार आहे. (देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान हे अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. – संपादक) मात्र त्यानंतरही गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच पट म्हणजे १५० फिरते हौद भाडेतत्वावर घेतले जाणार आहेत. ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या संदर्भातील कागदपत्रे मिळवली असल्यानेही ही गोष्ट उघडकीस आली आहे. आयुक्तांनी ही उधळपट्टी तातडीने थांबवण्याची मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.

विशेष म्हणजे या विसर्जन हौदांसाठी आयुक्तांनी वर्गीकरणातून निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून अंदाजपत्रकातील निधी वर्गीकरणाद्वारे पळवला जातो, असे सांगणार्‍या प्रशासनाकडूनही वर्गीकरणाद्वारे निधी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. (फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा व्यय करण्यापेक्षा पालिकेने भक्तांना वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची होणारी विटंबना रोखता येईल. फिरते हौद निर्मितीसाठी पालिका प्रशासनाने कचरापेट्यांचा उपयोग केल्याचे उघडकीस झाले होते. अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ? हिंदू सहिष्णू असल्यामुळे त्यांना धर्मानुसार आचरण करण्याचाही अधिकार नाही का ? – संपादक)