उज्जैन (मध्यप्रदेश) – महर्षि अरविंद यांची दिव्यता आणि योग्यता सर्वसामान्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. त्यांना अपेक्षित असलेले राष्ट्रनिर्मितीचे कार्य करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध आहे. सध्याच्या शिक्षण, समाज, राज्य, न्याय आदी व्यवस्थांमध्ये आमूलाग्र परिवर्तन आणण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा आमचा उद्देश आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
महर्षि योगी अरविंद यांची १५० वी जयंती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यांच्या निमित्त उज्जैनमधील श्री अरविंद सोसायटीच्या आश्रमामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते.
१. या वेळी व्यासपिठावर सांदिपनी वेद-विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रफुल्लकुमार मिश्रा, पू. अतुलकृष्ण भारद्वाज महाराज आणि मध्यप्रदेश जनकल्याण परिषदेचे उपाध्यक्ष श्री. विभाष उपाध्याय उपस्थित होते. या प्रसंगी वरील मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा प्रारंभ ध्वजारोहण, ‘वन्दे मातरम्’ गायन आणि ध्यान यांनी करण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ अनेकांनी घेतला.
२. पू. अतुलकृष्ण भारद्वाज म्हणाले, ‘‘भगवान श्रीकृष्ण सर्वांत मोठे योद्धे आहेत. आज त्यांचा पराक्रम उधृत होणे आवश्यक आहे. उज्जैन असे शहर आहे की, जेथे भगवान श्रीकृष्णाला भगवान परशुराम यांच्याकडून सुदर्शन चक्र मिळाले होते. ७ घोडे चालवण्याचे सामर्थ्य भगवान परशुराम आणि महर्षि सांदिपनी यांच्या नंतर केवळ भगवान श्रीकृष्णाकडे होते.’’
३. मध्यप्रदेश जनकल्याण परिषदेचे उपाध्यक्ष श्री. विभाषजी उपाध्याय म्हणाले, ‘‘सध्या कलियुग चालू आहे. यात दुष्ट शक्ती प्रबळ होत आहेत आणि सज्जनांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. अशा वेळी आपल्याला क्षात्रतेज वृद्धींगत करण्याची आवश्यकता आहे. योगी अरविंद यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जग एका रूपांतराकडे जात आहे. योगी अरविंद यांना आपण समजू शकत नाही; परंतु त्यांच्या विचारांचा स्पर्श अणि सेवा आम्हाला मिळाली, हे आमचे सद्भाग्य आहे.’’
४. प्रा. प्रफुल्लकुमार मिश्रा यांनीही योगी अरविंद यांच्याविषयी माहिती विचार प्रकट केले.