मानवाधिकार आयोगाकडून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना नोटीस !

मुसलमानबहुल भागातील घरातून बळजोरीने बाहेर काढण्यात येत असल्याची हिंदु युवतीने तक्रार करूनही कारवाई न केल्याचे प्रकरण

रजनीश शेठ

मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु असल्यामुळे मुसलमानबहुल भागातील स्वत:च्या घरातून बळजोरीने बाहेर काढण्यात येत असल्याची तक्रार हिंदु युवतीने करूनही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे मानवाधिकार आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी १७ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश मानवाधिकार आयोगाने पोलीस महासंचालकांना दिला आहे.

कु. सारिका जोगडिया यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सिद्ध विद्या यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. कु. सारिका जोगडिया या मुंबई महानगरपालिकेच्या बीआय्टी येथील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीमधील घरामध्ये रहातात. त्यांचे आजोबा आणि वडील मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होते. सध्या त्यांचा भाऊ पालिकेत स्वच्छता कर्मचारी आहे. कु. सारिका रहात असलेला भाग मुसलमानबहुल आहे. येथील स्थानिक मुसलमान जोगडिया कुटुंबियांना घराबाहेर काढण्यासाठी धमकावणे, ईदच्या दिवशी घराबाहेर गाय कापणे, ध्वनीक्षेपक लावणे अशा प्रकारे त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती; मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. मागील १० ते १२ वर्षांपासून मुसलमानांकडून अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप कु. सारिका यांनी केला आहे. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे शेवटी कु. सारिका यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. न्यायमूर्ती के.के. टातेड यांनी ५ ऑगस्ट या दिवशी या प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

संपादकीय भूमिका 

तक्रार करूनही कारवाई न करणार्‍या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !