महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भोसरी (पुणे) येथील शिवसृष्टी आणि मेघडंबरी यांची दुरवस्था !

शिवसृष्टी, भोसरी

भोसरी (जिल्हा पुणे) – येथील लांडेवाडी चौकात महापालिकेने शिवसृष्टीसह रायगड दरवाजाची प्रतिकृती आणि मेघडंबरी उभारली आहे; मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने शिवसृष्टी आणि मेघडंबरी यांचीही दुरवस्था झाली आहे. रायगड दरवाजाच्या प्रतिकृतीवरील दगड निखळून पडत असल्याने येथे भेट देणार्याय नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने येथील ऐतिहासिक प्रतिकृतींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक)

येथील पायऱ्यांसह इतर भागांतीलही फरशा निखळल्या आहेत. सुशोभीकरणासाठी लावलेल्या लोखंडी जाळ्याही तुटल्या आहेत. शिवसृष्टीमधील माहिती देणारा एक कोरीव लेख नाहीसा झाला आहे. शिवसृष्टी पहाण्यासाठी असलेल्या पदपथाचीही दुरवस्था झाली आहे. शिवसृष्टीसमोर असलेल्या रस्त्यावर टेंपो, ट्रक, खासगी बस आदी वाहने लावण्यात येत असल्याने शिवसृष्टी झाकून जात आहे. मेघडंबरी जवळीलही फरशा निखळून पडल्या आहेत. येथील दीर्घकाळ रखडलेल्या ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे काम नुकतेच पूर्ण होऊन हे प्रवेशद्वार वाहतुकीसाठी खुले झाले आहे; मात्र या प्रवेशद्वाराच्या रंगरंगोटीचे काम अर्धेच झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता महेंद्र देवरे म्हणाले की, रायगड दरवाजाच्या प्रतिकृतीमधील निखळलेले दगड काढून त्याची दुरुस्ती केली होती. गेल्या १ वर्षापासून निविदा प्रक्रिया बंद राहिल्याने डागडुजी रखडली होती. आता पुन्हा निविदा प्रक्रिया चालू झाल्याने लवकरच शिवसृष्टीच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्यात येईल. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते; मात्र या ऐतिहासिक वारशाकडे हवे तितके लक्ष दिले न गेल्याने याची दुरवस्था होणे, हे दुर्दैवी आहे. – संपादक)