(म्हणे) ‘कॅथॉलिक मिशनरी तमिळनाडूच्या विकासाचे मुख्य कारण !’

द्रमुकचे नेते आणि तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू यांचे संतापजनक विधान

( द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम) म्हणजे द्रविड प्रगती संघ)

द्रमुकचे नेते आणि तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या विकासामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कॅथॉलिक मिशनरी विकासाचे मुख्य कारण राहिले आहेत. येथील विकासाचा सशक्त पाया त्यांनीच निर्माण केला आहे. मिशनर्‍यांनी राज्यासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्याखेरीज तमिळनाडू बिहार बनले असते, असे संतापजनक विधान तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू यांनी २५ जुलै या दिवशी केले. भाजपने याचा तीव्र विरोध केला असून ‘अप्पावू यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

अप्पावू पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री (एम्.के. स्टॅलिन) जाणतात की, सरकार तुम्ही सर्वांनी (ख्रिस्त्यांनी) बनवले आहे. तुम्ही तुमचे कार्य मुख्यमंत्र्यांसमोर ठेवा ! मी तुमचे समर्थन करीन ! अप्पावू यांच्या वक्तव्यांवरून विरोध चालू झाल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, केवळ ख्रिस्ती मिशनर्‍यांनीच सर्वांना शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यांनी सामाजिक समानता आणली. द्रविड आंदोलन त्यांच्याच कार्याचा विस्तार आहे.

सत्ताधारी द्रमुकची मानसिकता हिंदुविरोधी ! – भाजप

भाजपचे प्रवक्ते मोहन कृष्ण यांनी अप्पावू यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवत म्हटले, ‘‘अप्पावू यांनी जो शब्दप्रयोग केला आहे, ती धर्मांधता आहे. या माध्यमातून तुष्टीकरण केले जात आहे. सत्ताधारी द्रमुकची मानसिकता हिंदुविरोधी आहे. द्रमुकची कार्यसूची (अजेंडा) हिंदूंना न्यून लेखणे आणि हिंदुविरोधी प्रचाराला प्रोत्साहन देणे, अशी आहे.’’

संपादकीय भूमिका

  • गेल्या काही मासांपासून तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांची हिंदुविरोधी कारस्थाने चालू असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ख्रिस्त्यांना सत्ताधार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या आरोपातील सत्यता यातून लक्षात येते !
  • हिंदूंनो, येनकेन प्रकारेण तुमचे धर्मांतर करू पहाणार्‍या मिशनर्‍यांचा असा उदोउदो केला जाणे, यातून द्रमुकच्या लेखी तुमची किंमत काय आहे, हे जाणा !
  • शा हिंदुद्रोही द्रमुकला निवडून देणारेही बहुसंख्य हिंदूच आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !