मुंबई – महापालिकेने शहरातील दुकाने आणि आस्थापने यांवर मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. महानगरपालिकेने याविषयीची माहिती उच्च न्यायालयात दिली. मुदतवाढ मिळण्याच्या मागणीसाठी हॉटेल मालकांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
‘मुदतवाढीच्या मागणीसाठी पुन्हा न्यायालयात येणार नाही’, अशी हमी याचिकाकर्त्यांनी द्यावी, अशी मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली; पण अशी हमी देऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत ‘पालिकेने दिलेल्या वाढीव मुदतीत मराठी पाट्यांच्या निर्णयाची कार्यवाही केली जाईल’, असे याचिकाकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आणि याचिकाकर्त्यांचे अधिवक्ते यांचे म्हणणे नोंदवून घेऊन याचिका निकाली काढली.