मुंबई – कोणत्याही बँकेच्या कर्मचार्याला तुमचे काम करण्यास विलंब झाला, तर तुम्ही त्या बँकेचे व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसर यांच्याकडे तक्रार करू शकता. जवळपास प्रत्येक बँकेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘तक्रार निवारण मंच’ असतो, त्या माध्यमातूनही तुमची तक्रार सोडवू शकता. बँकेने योग्य वर्तन न केल्यास ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेला संपर्क साधण्याचा अधिकार आहे. असे कोणतेही प्रकरण तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही ‘बँकिंग लोकपाल’कडे तक्रार करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता. अशा विविध सुविधा ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.
तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, त्या बँकेच्या कर्मचार्यांच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. बँकेच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावरही समस्या सांगू शकता. काही बँकांकडून ऑनलाईन तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधाही दिलेली असते.
कर्मचार्यांच्या निष्काळजीपणाविषयी ‘बँकिंग लोकपाल’कडे संपर्क करून किंवा ऑनलाईन पाठवू शकता. ऑनलाईन तक्रार देण्यासाठी तुम्ही https://cms.rbi.org.in या वेबसाईटवर ‘लॉगईन’ करून तक्रार देऊ शकता. बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १४४४८ हा ‘टोल फ्री’ क्रमांक असून ग्राहक त्यावर संपर्क करू शकतात.