नोंद
शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे, जिच्या साहाय्याने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक शिक्षणाच्या साहाय्याने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांची निर्मिती करतो. भारतीय संस्कृतीमध्ये आई आणि वडील यांच्यानंतर शिक्षकांनाच गुरु मानले जाते. शाळेत शिकवण्यात आलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यभर लक्षात रहातात आणि त्यानुसार आचरणही करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. अनेक वेळा अभ्यास चांगला होण्यासाठी शिक्षकांनी कठोर शब्दांत केलेली कानउघाडणी आणि दिलेला छडीचा मार यांमुळे आपल्या चांगले लक्षात रहाते अन् मोठे झाल्यावर ‘शिक्षकांनी दिलेल्या फटक्यांमुळे शिकलो’, असे आपण शिक्षकांविषयी कृतज्ञतापूर्वक सांगतो; मात्र सध्या विद्यार्थी अन् शिक्षक यांतील नाते दूषित होत चालले आहे. नुकताच धाराशिव जिल्ह्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या शिक्षकाच्या विरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला, तर एप्रिल २०२२ मध्ये चंद्रपूर येथील शिक्षकाने ७ शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकांमधील वाढत चाललेली वासनांधता शिक्षण विभागासाठी लज्जास्पद असून यातून त्यांची नीतीमत्ता खालावत जाणे दुर्दैवी आहे.
शाळा हे सर्वांत सुरक्षित स्थान मानले जाते; मात्र वासनांध शिक्षकांमुळे शाळेतच मुली सुरक्षित नाहीत. जर शाळेतच मुली सुरक्षित नसतील, तर समाजात त्या काय सुरक्षित असणार ? शिक्षक विद्यार्थ्यांच्या अयोग्य वर्तनावर अंकुश ठेवतात; परंतु आता शिक्षकांवर अंकुश ठेवण्याची वेळ येते, याहून दुर्दैव ते काय ? पालकांनी स्वत:च्या मुलांच्या वर्तणुकीकडे सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांनी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावे, यासाठी पालकांनी स्वत:हून त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. ज्या भारतभूमीत एकेकाळी गुरुकुलाच्या माध्यमातून सुसंस्कार केले जात होते, त्याच भूमीत शिक्षकांकडून असे प्रकार घडणे अशोभनीय आहे. त्यामुळे अयोग्य वर्तन असणार्या शिक्षकांना कठोर शिक्षा केल्यास अशा प्रवृत्तींवर नियंत्रण येऊ शकेल. अशा घटनांसंदर्भात कायदे कठोर असले, तरी त्यांची कार्यवाही चोख आणि तात्काळ असायला हवी.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर