उत्तम संस्कार जोपासून देशाचे उत्तम नागरिक म्हणून सिद्ध व्हा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

बेंगळुरू (कर्नाटक) येथील आचार्य श्री महाप्रज्ञा शाळेत सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन

पू. रमानंद गौडा

बेंगळुरू (कर्नाटक) – जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने १२ जुलै या दिवशी नंदिनी लेआऊट येथील आचार्य श्री महाप्रज्ञा शाळेतील विद्यार्थ्यांना ‘गुरुपौर्णिमा, तसेच संस्कारांचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी वरील मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेच्या संस्थापिका श्रीमती पार्वती विश्वनाथ, मुख्याध्यापिका सौ. शोभा प्रवीण आणि १५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील शिक्षक श्री. राधाकृष्ण भट यांनी व्यासपूजन केले. या वेळी पू. रमानंद गौडा यांचा शाळेच्या कार्यकारी मंडळाकडून शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. शाळेच्या संस्थापिका श्रीमती पार्वती विश्वनाथ म्हणाल्या, ‘‘सनातनचे ग्रंथ हे उत्तम संस्कार करणारे आहेत. मी वैयक्तिकरित्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी या ग्रंथांची माहिती पोचवीन. पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेतील विद्यार्थ्यांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ देऊ, तसेच शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला धर्मशिक्षणवर्गाचे नियोजन करू.’’

२. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी ‘संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाला आम्ही उपस्थित राहू’, असे सांगितले.