हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

आज अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते. तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणाऱ्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? या भीतीचे सद्यःस्थितीत मुख्य कारण आहे, जगात सर्वांत शीघ्र गतीने वाढणारी इस्लामी शरीयतवर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ ! या अर्थव्यवस्थेचा ‘स्थानिक व्यापारी, उद्योजक यांना, तसेच अंतिमतः राष्ट्राला काय धोका संभवतो ?’, याचा विचार करण्यासाठी हा विषय समजून घेणे आवश्यक आहे.

१. हलाल म्हणजे काय ?

इस्लाममध्ये ‘हलाल’ आणि ‘हराम’ हे मूळ अरबी भाषेतील शब्द प्रसिद्ध आहेत. ‘हलाल’ शब्दाचा अर्थ आहे, ‘इस्लामनुसार वैध, संमत, मान्यता असलेले’; तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे, ‘हराम’ अर्थात् इस्लामनुसार अवैध, निषिद्ध किंवा वर्जित असलेले.’

श्री. रमेश शिंदे

२. ‘हलाल’ पद्धतीनुसार पशूहत्येचे नियम

इस्लाममध्ये ‘हलाल’ मुख्यतः पशूहत्या करून मांस मिळवण्याच्या संदर्भात असल्याने त्याविषयीचे नियम पुढीलप्रमाणे –

अ. पशूची हत्या करणारा मुसलमान असला पाहिजे.
आ. ज्या पशूची हत्या करायची आहे, तो निरोगी आणि सुदृढ असला पाहिजे.
इ. पशूची हत्या (जिबा) करण्यापूर्वी ‘बिस्मिल्लाह’चे उच्चारण केले पाहिजे.
ई. पशूच्या गळ्यावरून सुरी फिरवतांना त्याचे मुंडके ‘काबा’च्या दिशेने केले पाहिजे.
उ. धारदार सुरीने एकाच घावात त्या प्राण्याची श्वासनलिका, रक्तवाहिन्या आणि गळ्याच्या नसा कापल्या गेल्या पाहिजेत. रक्त ‘हराम’ असल्याने ते संपूर्ण वाहून जाऊ दिले पाहिजे.
ऊ. पशूला वेदना होऊ नयेत; म्हणून त्याला अगोदर बधीर करणे निषेधार्ह आहे.

३. ‘हलाल’ पद्धत पशूसाठी सर्वांत अल्प वेदनादायक असल्याचा खोटा प्रचार !

‘हलाल’ पद्धतच सर्वांत अल्प वेदनादायक असल्याचे वर्ष १९७८ मध्ये सिद्ध झाल्याचा दावा मुसलमानांकडून केला जातो. प्रत्यक्षात या संदर्भात पुढच्या काळात झालेल्या संशोधनात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

वर्ष २००९ मध्ये न्यूझीलंडच्या ‘मॅसी विद्यापिठा’तील क्रेग जॉन्सन यांनी केलेल्या संशोधनात ‘‘हलाल’ पद्धतीने पशूचा गळा कापल्यानंतर २ मिनिटांपर्यंत त्या पशूला वेदना सहन कराव्या लागतात’, हे सिद्ध झाले. यामुळे ‘हलाल’ पद्धत पशूंसाठी क्रूर असल्याचे सिद्ध झाले असून, जगभरात ‘हलाल’ला विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे युरोपमधील डेन्मार्क, नेदरलँड्स, स्वीडन, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि इंग्लंड आदी अनेक देशांमध्ये सचेत पशूला ‘हलाल’ करण्यावर वर्ष २०१७ मध्ये कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुसलमानांनी विद्युत् झटक्याने पशूला अचेतन केल्यासही ते मांस ‘हलाल’ मानण्याचे मान्य केले. भारतात मात्र ‘पशू क्रूरता निवारण अधिनियम, १९६०’ या कायद्यात धार्मिक कारणांसाठी (हलाल पद्धतीने) केलेल्या पशूहत्येतील क्रूरतेला संरक्षण देण्यात आले आहे.

४. ‘हलाल’ चळवळीचा उद्देश

४ अ. मांस व्यापारावर नियंत्रण मिळवणे : ‘हलाल’च्या नियमांनुसार पशूहत्या करणारा मुसलमान असण्याची पहिलीच अट असल्यामुळे मुसलमान नसलेल्या व्यक्तीने केलेल्या पशूहत्येला ‘हलाल’ मानले जात नाही. त्यामुळे ‘हलाल’च्या वाढत्या मागणीमुळे आपोआपच हा मांसविक्रीचा वार्षिक सुमारे ३ लाख कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवसाय मुसलमानांच्या नियंत्रणात जात आहे.

४ आ. ‘हलाल’ चळवळीद्वारे जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करणे : बोस्नियाचे ग्रँड मुफ्ती डॉ. मुस्तफा सेरिक यांनी पाकिस्तानमध्ये भाषण करतांना म्हटले आहे, ‘‘मुसलमानांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करण्याची शक्ती ‘हलाल चळवळी’त आहे. यासाठी तंत्रज्ञान सोडून मुसलमान समाजाने अन्न उत्पादन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.’’

५. ‘हलाल अर्थव्यवस्था’ : स्वरूप, विस्तार आणि प्रचार

५ अ. इस्लामच्या आधारे ‘हलाल’ उद्योगाची आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारे ‘इस्लामिक बँके’ची वृद्धी होणे : ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची मूळ संकल्पना ‘शेतातून ग्राहकांपर्यंत’ (From farm to fork) होती. या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी ‘HSBC – अमानाह मलेशिया’ या इस्लामिक बँकेचे कार्यकारी अधिकारी रेफ हनीफ यांनी स्पष्टपणे म्हटले, ‘‘जर आपल्याला ‘हलाल अर्थव्यवस्थे’कडे पाऊल टाकायचे असेल, तर आपण अर्थनियोजनापासून ते उत्पादनापर्यंत संपूर्ण साखळी ‘हलाल’ करण्याचा प्रयत्न करायला हवा.’’ अर्थात् ‘हलाल’ उत्पादनांतून लाभ मिळवायचा आणि तो निधी ‘इस्लामिक बँके’त गोळा करायचा. त्यानंतर ‘इस्लामिक बँके’ने त्या पैशांतून ‘हलाल’ उत्पादकांना आर्थिक साहाय्य करून त्यांचा व्यवसाय वाढवण्यास साहाय्य करायचे. अशा प्रकारे हलाल व्यापारावर नियंत्रण ठेवल्याने मलेशियातील ‘इस्लामिक बँके’च्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली.

५ आ. इस्लामी देशांत उत्पादने निर्यात करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ बंधनकारक करणे ! : ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (OIC)’ या संघटनेने इस्लामी देशात उत्पादने निर्यात करायची झाल्यास प्रथम त्या उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणित करणाऱ्या अधिकृत इस्लामिक संघटनेकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले. हा एक प्रकारचा ‘जिझिया कर’च आहे.

६. ‘हलाल अर्थव्यवस्थे’साठी ‘हलाल’ संकल्पनेचा विस्तार !

इस्लामी धर्मग्रंथांमध्ये मांस वगळता अन्य क्षेत्रांसाठी ‘हलाल’ संकल्पना स्पष्ट नाही. त्यामुळे मौलानांकडून ‘हलाल’ संकल्पनेचा विस्तार कसा केला जात आहे, हे लक्षात घेऊया.

६ अ. ‘हराम’ गोष्टींना ‘हलाल’ ठरवणे : काही वर्षांपूर्वी ‘हराम’ मानल्या जाणाऱ्या गोष्टी मौलानांकडून आज ‘हलाल’ ठरवल्या जात आहेत. याचे उदाहरण म्हणजे, पूर्वी ‘अजान’ची हाक देण्यासाठी मानवनिर्मित ध्वनीक्षेपक यंत्राचा वापर करणे, हे ‘हराम’ मानले जात होते. आज त्याला ‘हलाल’ ठरवून प्रत्येक मशिदीवर बसवण्यात आले आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून ‘मेकअप’ करण्याला ‘हराम’ मानले जात होते. आता मात्र सौंदर्यप्रसाधनांनाच ‘हलाल प्रमाणपत्र’ दिले जात आहे.

६ आ. मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ : आता मांसाहारी पदार्थच नव्हेत, तर सुप्रसिद्ध ‘हल्दीराम’चे शुद्ध शाकाहारी नमकीनसुद्धा ‘हलाल’ प्रमाणित झाले आहे. धान्य, खाद्यतेल, गव्हाचे पीठ – आटा, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शीतपेये इत्यादींनाही ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आले आहे.

६ इ. औषधे : युनानी, आयुर्वेदीक औषधांतही ‘हलाल’ची संकल्पना लागू करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर तुळशीचा अर्क, चहा यांनाही ‘हलाल’ प्रमाणित केले जात आहे.

६ ई. सौंदर्यप्रसाधने : साबण, काजळ, ‘शांपू’, ‘टूथपेस्ट’, ‘नेलपॉलिश’, ‘लिपस्टिक’ इत्यादी सौंदर्यप्रसाधनेही आता ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आली आहेत.

६ उ. ‘हलाल फॅशन’ : ‘हिजाब’, ‘बुरखा’ यांसारखी स्त्रियांना बंधनात घालणारी इस्लामी वस्त्रप्रावरणे यांद्वारे आधुनिक पद्धतीत उपलब्ध करून दिली जात आहेत.

६ ऊ. ‘हलाल डेटिंग’ संकेतस्थळे : युवक-युवतींचा परिचय करून देणाऱ्या ‘ऑनलाईन डेटिंग’ क्षेत्रातही शरीयतवर आधारित ‘हलाल डेटिंग वेबसाईट्स’ चालू आहेत.

६ ए. ‘हलाल’ घरगुती यांत्रिक उपकरणे : इंडोनेशियामध्ये तर ‘रेफ्रिजरेटर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’, या घरगुती यांत्रिक उपकरणांनाही ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यात आले.

६ ऐ. ‘हलाल’ प्रमाणित गृहसंकुल : केरळ राज्यातील कोची शहरात शरीयतच्या नियमांच्या आधारे ‘हलाल’ प्रमाणित गृहसंकुल बनत आहे. यात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे स्विमिंग पूल आणि प्रार्थनास्थळे, काबाच्या दिशेपासून दूर असणारी शौचालये, अशा विविध सुविधांचा उल्लेख आहे.

६ ओ. ‘हलाल’ प्रमाणित रुग्णालये : चेन्नई, तमिळनाडू येथील ‘ग्लोबल हेल्थ सिटी’ या रुग्णालयाला ‘हलाल प्रमाणित’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. यातून आखाती देशांतील धनाढ्य मुसलमान रुग्णांना आकर्षित केले जात आहे.

६ औ. ‘हलाल टूरिजम’ : मुसलमानांचा पर्यटनासाठी खर्च होणारा पैसा इस्लामी देशांना मिळावा किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी अन्य देशांनी विशेष सुविधा द्याव्यात, हाही यामागचा एक उद्देश आहे.

६ अं. हलाल अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ! : वर्ष २०१७ मध्ये ‘हलाल अर्थव्यवस्था’ २.१ ‘ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स’ (१ ‘ट्रिलीयन’ म्हणजे १ वर १२ शून्य) एवढी होती, तर वर्ष २०१९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था २.७ ‘ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स’ होती. ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा वेग पहाता ती लवकरच भारताच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकू शकते.

७. ‘हलाल प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी मुसलमान निरीक्षक नेमणे आवश्यक !

उत्पादनाच्या वेळी ‘हलाल’च्या नियमांचे पालन होते का ? हे पडताळण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ देणाऱ्या संस्थेचा ‘हलाल ऑडिटर’ (निरीक्षक) कारखान्यात नियुक्त करण्याची अट घातली जात आहे. तसेच अन्य सर्व कर्मचाऱ्यांवर ‘हलाल’ नसलेले खाद्यपदार्थ उत्पादन क्षेत्रात आणण्यास बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/600973.html