स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट !
मुंबई – काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी केलेल्या तक्रारीवर योग्य ती कारवाई केली जाईल. आता हिंदुत्वाच्या विचारांचे लोक सरकारमध्ये आहेत. काँग्रेसने नेहमीच वीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. वीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ५ जुलै या दिवशी एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी अभिवादन केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्या आमदारांची घुसमट होत होती. हिंदुत्व आणि वीर सावरकर यांचे विचार व्यक्त करता येत नव्हते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. ‘नवीन शासन प्रखर हिंदुत्वावर चालावे’, अशी आमची आग्रही भूमिका आहे. त्यामुळेच वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे हिंदुत्व होते, तेच आमचे हिंदुत्व आहे. हिंदुत्व हे अन्य धर्माचा तिरस्कार करणारे नाही. ‘राज्याचा विकास’, हेच आमचे प्राधान्य आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा विकास असेल. कायदा आणि सुव्यवस्था यांमध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.’’