राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा
पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप, फुटीचे आणि घडामोडी यांचे भाकित जानेवारी २०२२ मध्येच वर्तवले होते, असा दावा ‘ज्योतिष ज्ञान’ मासिकाचे संपादक आणि राजकीय ज्योतिषाचे अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी २५ जून या दिवशी पुण्यात पत्रकाद्वारे केला. ‘ज्योतिष ज्ञान मासिक’ अंकातील जानेवारी २०२२ च्या आवृत्तीमध्ये हे भाकित वर्तवले होते.
श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, १४ जून या दिवशीची पौर्णिमान्त कुंडली आणि २९ जून या दिवशीची अमान्त कुंडली यांवरून जून २०२२ या मासात महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता दिसत होती. सत्तांतर होणे, मोठे पक्ष अथवा आघाडीमध्ये फूट पडणे, यांविषयीचे भाकित मी वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. यापूर्वीसुद्धा ‘वर्ष २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील’, असे भाकित मी विविध दूरचित्रवाहिन्यांवरून वर्तवले होते. तेही खरे ठरले होते.
जानेवारी २०२२ मध्ये वर्तवलेले भाकित
चतुर्थातील शनी विरोधी पक्षाचे बळ वाढवणारा असून सत्ताधारी पक्ष अडचणीत येईल. मोठ्या पदावरील व्यक्तीचा मृत्यू होऊन किंवा ती त्यागपत्र देईल. काही राज्यांत सत्तांतर होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील. ग्रहस्थितीचा विचार करता मे-जून मास स्फोटक घटनांचा असू शकतो. या मासात राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वाटते. एखाद्या मोठ्या राज्यातील सरकार बरखास्त होऊ शकते. केंद्रीय आणि राज्य मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत अनपेक्षित पालट होण्याची शक्यता असून मोठे पक्ष किंवा आघाडीमध्ये फूट पडेल.
राजकीय भूकंपाला पोषक स्थिती
सध्याची ग्रहस्थिती महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला पोषक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेचा विचार करता त्यांचे कन्या लग्न आणि सिंह रास आहे. कन्या लग्नाच्या आठव्या स्थानात मंगळ येतोय. त्यासह तेथे हर्षल आणि राहू ग्रह आला आहे. जून मास त्यांच्यासाठी प्रतिकूल आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्या पत्रिकेच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की, भाजपच्या मीन राशीत रवि, गुरूची भ्रमणस्थिती या सगळ्या राजकीय परिस्थितीला पोषक असून, पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांची धनु रास आणि गुरु सध्या स्वराशीत असल्यामुळे मोठ्या पदाची अपेक्षा दर्शवतो, त्यांना तशी संधीही चालून आली आहे.
संपादकीय भूमिकाज्योतिषशास्त्र नाकारणाऱ्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक ! यावरून ज्योतिषशास्त्राची महानता लक्षात येते ! |