अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसह नुकतीच ‘अग्नीपथ भरती योजने’ची घोषणा केली आहे. या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.


(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. अग्नीपथ योजनेचे स्वरूप !

कोरोना संक्रमणामुळे गेल्या २ वर्षांपासून सैन्यातील भरती प्रक्रिया रखडल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने ही योजना घोषित केली आहे. भारतीय भूदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये ४ वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल. यापूर्वी भारतीय सैनिक भरती व्हायचे आणि ते १५ ते १७ वर्षे नोकरी करून निवृत्त व्हायचे. त्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन मिळायचे. आता या योजनेच्या अंतर्गत भरती होणारे युवक, म्हणजेच ‘अग्नीवीर’ ४ वर्षांपर्यंत सेवा देतील. त्यांना ६ मास प्रशिक्षण देण्यात येईल. ४ वर्षांपर्यंत हे वेतन ४० सहस्र रुपयांपर्यंत पोचेल. अन्य सैनिकांना मिळणाऱ्या सर्व सवलती त्यांनाही मिळतील. त्यात सैनिकांना मिळणारा जीवन विम्याचा लाभही अंतर्भूत आहे. ४ वर्षे सेवा दिल्यानंतर या युवकांना १० ते ११ लाख रोख रक्कम मिळणार आहेत.

२. अग्नीपथ योजना म्हणजे रोजगाराची उत्तम संधी !

‘योजनेमुळे सैन्याची थोडी हानी होईल’, असे सैन्याचे काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते. ‘युवकांना त्यांचे कौशल्य पूर्णपणे समजणार नाही’, असेही काही जणांनी म्हटले होते; पण ते योग्य नाही. सैन्यात ४ वर्षे घालवल्यानंतर युवकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. खडतर परिस्थितीत कसे काम करायचे, त्यांना समजले असेल. त्यांच्यात शिस्त निर्माण होईल. नेतृत्वगुण वाढेल. सैन्यातून परत आल्यावर त्याचा त्यांना कॉर्पाेरेट क्षेत्र, केंद्रीय सशस्त्र दल, पोलीस आदी ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी लाभ होईल. त्यामुळे मराठी तरुणांसाठी सैन्यात भरती होण्याची ही चांगली संधी आहे. या सैनिकांना ‘अग्नीवीर’ संबोधले जाणार आहे. भारताची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. दुर्दैवाने ज्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण व्हायला पाहिजेत, तेवढ्या प्रमाणात त्या निर्माण होत नाहीत. निवृत्ती वेतन मिळणाऱ्या नोकऱ्या अजिबात निर्माण होत नाहीत. त्यामुळे आता भारतीय युवकांनी जे मिळत आहे, ते आधी घेतले पाहिजे. सैन्यातून आल्यानंतरही त्यांना पुढील प्रगती करता येणार आहे.

३. मराठी तरुणांसाठी सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी !

आलेल्या वृत्तानुसार, यातील २५ टक्के तरुणांना कायमचे स्वीकारले जाईल. अन्य तरुणांना बाहेर पडावे लागेल; पण त्यांना १०-११ लाख रुपये मिळतील. या पैशांचा त्यांना अन्य रोजगार मिळवण्यासाठी लाभ होईल. महाराष्ट्रातील साडेसतरा ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांनी या संधीचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे. नाहीतर ही संधी पूर्व भारत किंवा दक्षिण भारतातील तरुण घेऊन जातील. त्यामुळे सिद्धता करा, उत्तीर्ण व्हा आणि सैन्यात भरती व्हा ! मला निश्चिती आहे की, यासाठी महाराष्ट्रातील तरुण सिद्धता करतील आणि भरती होतील.

४. सैन्यभरतीची सिद्धता कशी कराल ?

चांगल्या आधुनिक वैद्यांकडून वैद्यकीय चाचणी करून घ्या. लेखी परीक्षेच्या सिद्धतेसाठी बाजारात पुस्तके उपलब्ध आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य गोष्टींची सिद्धता करा. सैन्य भरतीसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खासगी शिकवण्या आहेत. महाराष्ट्र सरकारचे ‘पीआयटीसी’ नावाचे केंद्र आहे. तेथे सैन्यात भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. तिथे शुल्कही अल्प असते.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.

संपादकीय भूमिका

अग्नीपथ योजनेत युवकांनी सहभागी होऊन देशसेवा करावी आणि स्वत:मध्ये शिस्त, नेतृत्वगुण यांची वृद्धी करावी !