जी.आय.एस्. मॅपिंगसाठी नेमलेल्या आस्थापनांना पावणेतीन कोटी रुपयांचा दंड !

पुणे – शहरातील मिळकतकराची माहिती घेण्यासाठी आस्थापनांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने अनेक मिळकतधारकांची ४० टक्केची (मिळकत करावर ४० टक्के सवलत दिली जात होती.) सवलत रहित झाली आहे. यामुळे नागरिकांना मिळकत कराची ज्यादा रकमेची देयके आल्याने महापालिका प्रशासनावर प्रचंड टीका होत आहे. महापालिकेने हे काम करणाऱ्या ‘सारा आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सायबर टेक सिस्टीम अँड सॉफ्टवेअर’ या २ आस्थापनांना पावणेतीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संस्थांनी मिळकतीची अंतर्गत मापे पडताळणे, मिळकतधारकाचा भ्रमणभाष क्रमांक, ई-मेल पत्ता, मिळकतीची छायाचित्रे, मिळकतीचा जुना मिळकत कर क्रमांक आणि जी.आय.एस्. मिळकत क्रमांक यांचा समावेश करून क्यूआर कोड सिद्ध करून देणे, ही कामे करणे आवश्यक होते; मात्र या दोन्ही आस्थापनांकडून चुकीच्या पद्धतीने काम केल्याने नागरिकांची ४० टक्केची सवलत गेली आहे. या चुकीच्या कामामुळे आस्थापनांना दंड केला असल्याचे मिळकत कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले.