मालवण – तारकर्ली येथे नौका उलटून दोघांचा मृत्यू, तर काही जण घायाळ झाल्याची दुर्घटना नुकतीच घडली होती, तसेच अन्यत्रच्या समुद्रकिनार्यांवरही विविध दुर्घटना घडत असतात; मात्र यातून कोणताही बोध न घेता पर्यटकांकडून समुद्रकिनारी आततायीपणा केला जात आहे. ७ जूनला समुद्राला मोठी ओहोटी आल्यामुळे मालवण समुद्रकिनार्यावर वाळूतून चारचाकी गाड्या घेऊन काही पर्यटक येथील पद्मगडाच्या ठिकाणी पोचले. समुद्राला भरती आली, तर या ठिकाणावरून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्याची कोणतीही भीती त्या पर्यटकांना नव्हती. याविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना समज दिली अन् दंडही आकारला.
सिंधुदुर्ग किल्ला पहाण्यासाठी आल्याचे पर्यटकांनी पोलिसांना सांगितले; परंतु सध्या किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी होडीसेवाही बंद आहे, तसेच दुसरा कोणताही मार्ग किल्ल्यावर जाण्यास नाही. असे असतांनाही अनावश्यक धारिष्ट्य दाखवणे पर्यटकांच्या जिवावर बेतू शकते. पर्यटकांनी अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून किनार्यावर जाऊ नये. यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्याकडून सातत्याने आवाहन करण्यात येते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गाड्या घेऊन आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समज देत बाहेर काढले होते. त्यामुळे यापुढे असे पर्यटक पुन्हा आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकापोलीस आणि प्रशासन यांना वेठीस धरणार्या पर्यटकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |