नुपुर शर्मा भाजपमधून निलंबित !

प्रवक्त्या नुपुर शर्मा निलंबित

नवी देहली – भाजपने त्यांच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. महंमद पैगंबर यांच्याविषयी एका वृत्तावाहिनीवरून कथित अवमानकारक विधान केल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यासह नवीन जिंदल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. नुपुर शर्मा यांच्याविरोधात देशात काही ठिकाणी गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. नुपुर शर्मा प्रकरणावरूनच कानपूर येथे मुसलमानांनी हिंसाचार केला होता.

कोणत्याही धर्माशी संबंधित व्यक्तीचा अवमान करणे अयोग्य ! – भाजप

भाजप प्रत्येक धर्माचा मान राखतो, तसेच कोणत्याही धर्माशी संबंधित व्यक्तीचा अवमान करण्याचा निषेध करतो, असे भाजपने काढलेल्या एका निवेदनात नुपुर शर्मा यांचे नाव न घेता म्हटले आहे.

कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेते ! – नुपुर शर्मा

मी गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी होत आहे. तेथे माझे आराध्य भगवान शिवाचा अवमान केला जात होता. माझ्या समोर म्हटले जात होते, ‘ज्ञानवापीत सापडलेले शिवलिंग नसून कारंजे आहे’, ‘देहलीच्या प्रत्येक पदपथावर अनेक शिवलिंग सापडतात, तेथे जा आणि पूजा करा.’ माझ्यासममोर सतत आमच्या भगवान शिवाचा होणारा अपमान मी सहन करू शकले नाही आणि माझ्याकडून काही गोष्ट बोलल्या गेल्या.

जर माझ्या शब्दांमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेते. माझा हेतू कुणाला दुखवायचा कधीही नव्हता, असे स्पष्टीकरण नुपुर शर्मा यांनी ट्वीट करून दिले आहे.