समीर गायकवाड यांच्या अटकेची माहिती देणारे पोलीस अधिकारी संजय कुमार हे श्री तुळजाभवानी मंदिर घोटाळ्याप्रकरणी गप्प का राहिले ? – सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

मुंबई – कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविषयीचा चौकशी अहवाल अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी २० सप्टेंबर २०१७ या दिवशी गृह विभागाला सादर केला; मात्र या संवेदनशील विषयाची माहिती समाजाला देऊन जनतेला अवगत केले नाही. दुसरीकडे कोल्हापूर येथील पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड यांना ज्या वेळी अटक करण्यात आली, तेव्हा त्याविषयीची माहिती देण्यासाठी पोलीस अधिकारी संजय कुमार हे पुण्याहून कोल्हापूरला आले. त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्याविषयी प्रसिद्धीमाध्यमांना माहिती सांगितली. यातून त्यांनी समाजवाद्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न श्री तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्याविषयी केला असता, तर ५ वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात मोठी जनजागृती होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली असती, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.