‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील अमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणी १४ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट !

पुराव्यांअभावी आर्यन खान याच्यासह ६ जणांविरोधात आरोप नसल्याचे प्रतिपादन !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील अमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणी १४ जणांविरुद्ध केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. सबळ पुराव्यांअभावी आर्यन खानसह ६ जणांच्या विरोधात कोणतेही आरोप नाहीत, अशी माहिती केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने प्रसिद्धीपत्रकामध्ये दिली आहे. या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या विशेष अन्वेषण पथकाला न्यायालयाने आरोपपत्र प्रविष्ट करण्यास ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती. या प्रकरणी आर्यनसह २० जणांना अटक झाली होती. आरोपपत्र ६ सहस्र पानांचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय षड्यंत्र सिद्ध होऊ शकले नाही. अन्वेषण यंत्रणा केवळ ‘व्हॉट्सॲप’ संभाषणाच्या आधारे सबळ पुरावे गोळा करू शकली नाही’, असे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.

आर्यन खान

पथकाने २ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमित यांना इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून कह्यात घेतले होते. नुपूर, महक आणि मुनमुन यांना ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरून कह्यात घेतले होते. यापैकी आर्यन आणि महक वगळता सर्वांकडे अमली पदार्थ सापडले होते.

आता समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करणार का ? – नवाब मलिक

डावीकडून समीर वानखेडे आणि नवाब मलिक

मुंबई – चित्रपट अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे नाव सबळ पुराव्यांअभावी ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील अमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणाच्या दोषारोपपत्रामधून वगळण्यात आले आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी कारागृहातून ट्वीट करून केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी अधिकारी समीर वानखेडे, त्यांचे पथक आणि त्यांच्या ‘प्रायव्हेट आर्मी’विरोधात कारवाई करेल का कि गुन्हेगारांना ते पाठीशी घालतील ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याविषयी समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.