श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आतापर्यंत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने आम्हाला अनेक सेवा करायला मिळाल्या आहेत. त्यापैकी एक सेवा म्हणजे महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ करत असलेल्या दैवी दौऱ्यात त्यांचे वाहन (चारचाकी गाडी) चालवण्याची मिळालेली सेवा !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत आम्हाला भारतभर भ्रमण करण्याची संधी मिळाली. या दौऱ्याच्या अंतर्गत सेवा करतांना आम्हाला विविध तीर्थक्षेत्रे, विविध मंदिरे आणि अनेक संत यांना भेटण्याची, विविध संस्कृती अन् कला पहाण्याची संधी मिळाली. त्याच समवेत ‘संत आणि साधक यांचे रक्षण व्हावे’, यासाठी महर्षींच्या आज्ञेनुसार परिहार (उपाय) करण्याची अमूल्य संधीही आम्हाला मिळाली. ही सेवा करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या अद्भुत गाडीविषयी आम्हाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यासाठी वापरण्यात येणारे अद्भुत वाहन

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चारचाकी गाडीविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. विनीत देसाई

१ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील चैतन्याने सलग ३६ घंटे प्रवास करूनही थकवा न येणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यासाठी असलेल्या या चारचाकी गाडीने आम्ही सहस्रो कि.मी. प्रवास केला आहे; पण ‘त्या प्रवासानंतर आम्हाला थकवा न येता आमचा उत्साह आणि आनंद वाढला आहे’, असेच आमच्या लक्षात येत असे. एकदा आम्ही देहली ते बंगळुरू असा सुमारे २,४०० कि.मी. प्रवास सलग कुठेही न थांबता केला. त्या पूर्ण प्रवासासाठी आम्हाला एकूण ३६ घंटे लागले. या प्रवासानंतर आमची केवळ ५ घंटेच झोप झाली; पण ती झोप आम्हाला २४ घंटे झोप घेतल्याप्रमाणे वाटली.

१ आ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रमाणे त्यांची गाडीही साधकांवर आईप्रमाणे माया करत असणे : या प्रवासानंतर झोपून उठल्यावर आमच्यामध्ये एवढा उत्साह होता की, ‘पुन्हा तुम्हाला देहलीला जायचे आहे’, असे कुणी सांगितले असते, तरी आमची निघण्याची सिद्धता होती. तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘ही ऊर्जा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चैतन्य आणि या गाडीची सेवेप्रती असणारी तळमळ यांमुळे हे सर्व साध्य होऊ शकत आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या अस्तित्वाने त्यांच्या गाडीमध्येही आमच्याप्रती प्रेमभाव आणि आईसारखी माया निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘ती गाडीही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रमाणेच आमची काळजी घेते’, असे आम्हाला जाणवते.

१ इ. साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे गाडी चालवतांना चूक होणे; मात्र ‘गाडीच साधकांची काळजी घेऊन त्यांना वाचवते’, असे जाणवणे : आमच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे आमच्या हातून गाडी चालवतांना कधीतरी निष्काळजीपणा होतो. अशा वेळी मोठी चूक होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण होते; मात्र ती गाडीच स्वतःला सावरून घेते. काही वेळा पुढच्या गाडीला ‘ओव्हरटेक’ करतांना जागा अगदी लहान असते, तेव्हा ‘गाडी तिचा आकार लहान करून त्या लहान जागेतून बाहेर निघते आणि आम्हाला आमच्या चुकीची जाणीव करून देते.’ अशा वेळी गाडीची क्षमा मागून ‘पुढे अशी चूक होऊ नये’, यासाठी आमच्याकडून काळजी घेतली जाते.

१ ई. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यातील गाडीने प्रवास करणे आणि वैयक्तिक गाडीने प्रवास करणे, यांत मोठा भेद जाणवणे : वैयक्तिक कारणासाठी आम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करतो, तेव्हा एक घंटा प्रवास केला, तरी पुष्कळ प्रवास केल्याप्रमाणे आमचे शरीर थकते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यासाठी आम्ही त्यांच्या गाडीने सेवेसाठी अधिकाधिक १६ ते १८ घंटे सलग प्रवास केला आहे. तेव्हा ते कार्य सहजतेने होते. तेव्हा ‘हे सगळे केवळ ईश्वरी कृपा आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे अस्तित्व अन् त्यांच्यातील चैतन्य यांमुळेच होते’, असे आमच्या लक्षात येते.

२.श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या गाडीविषयी आलेल्या अनुभूती

श्री. स्नेहल राऊत

२ अ. ‘साधक गाडी चालवत नसून ती गाडीच साधकांना घेऊन जाते; कारण ‘साधकांपेक्षा गाडीलाच परिपूर्ण सेवा करण्याची ओढ आहे’, असे लक्षात येणे : बरेच साधक आम्हाला विचारतात, ‘‘तुम्ही इतका प्रवास करता; पण तुम्ही दमत कसे नाही ?’’ किंवा ‘‘तुम्ही इतका प्रवास कसे काय करू शकता ?’’ तेव्हा आमच्या लक्षात येते, ‘आम्ही ती गाडी चालवतच नाही. ती गाडीच आम्हाला घेऊन जात असते.’ आम्ही गाडी चालवत असतो, तर आतापर्यंत आम्हाला शारीरिक दुखणे झाले असते आणि गाडी चालवणे थांबवावे लागले असते. आमच्याकडून अनेक वेळा अपघातही झाले असते; पण तसे काही झाले नाही; कारण आमच्यापेक्षा त्या गाडीलाच परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ आणि ओढ आहे.

२ आ. दैवी प्रवास करतांना आलेल्या अनेक कठीण प्रसंगांतून सुरक्षितपणे घेऊन जाणारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची दैवी वाटणारी अद्भुत गाडी ! : कधी कधी आमचा प्रवास प्रतिदिन १२ ते १४ घंटे याप्रमाणे सलग ३ – ३ दिवस चालू असतो. अनेक ठिकाणी आम्हाला कठीण मार्ग आणि कठीण परिस्थिती यांमधून जावे लागते, तरी गाडीला आलेल्या अडचणींमुळे प्रवास थांबवावा लागला, असे आतापर्यंत एकदाही झाले नाही. ‘निर्जीव वस्तू असूनही गाडीने नेहमीच आमचा परिपूर्ण विचार केला आहे’, असेच आम्हाला नेहमी जाणवते.

१. एकदा अहमदाबाद येथे जातांना मार्गावर गुडघ्यापर्यंत पाणी आले होते. त्यामुळे इतर अनेक वाहने थांबली होती. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ गाडीत होत्या. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘आपण जाऊया.’’ आमची गाडी पाण्यातून जाऊ लागल्यावर तिथे थांबलेल्या इतर गाड्याही आमच्यामागून यायला लागल्या. आम्ही सुरक्षितपणे पुढे गेलो.

२. ‘गाडीच्या ‘टायर’मध्ये खिळा गेला आहे’, हेही या गाडीनेच २ – ३ वेळा आमच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे अडचणी येण्यापूर्वीच आम्हाला उपाययोजना करता आली आहे.

३. गाडीचे ‘टायर’ कधी ‘पंक्चर’ झाले, तरी ते अशा ठिकाणी झाले आहे की, तिथे आम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची आवश्यकता भासली नाही.

३. या दैवी गाडीमुळे साधकांच्या गाडीविषयी असलेल्या विचारप्रक्रियेत झालेला पालट !

३ अ. ‘गाडी म्हणजे सहसाधक आहे’, असा भाव निर्माण झाल्यामुळे तिच्या क्षमतेनुसार तेवढ्याच वेगाने गाडी चालवली जाणे : आधी गाडी चालवतांना त्या गाडीविषयी आमच्या मनात ‘एक वाहन’ एवढाच भाव असायचा. त्यामुळे गाडी चालवतांना गतीचा विचार न होता अनेक वेळा अधिक गतीनेही गाडी चालवली जायची; पण अलीकडे ‘ते वाहन नसून सहसाधक आहे. ‘नेहमीपेक्षा अधिक गतीने चालायला सांगितले, तर आपल्याला कसे वाटेल ?’, असा आता गाडीविषयी विचार होतो. त्यामुळे अलीकडे गाडी चालवतांना तिच्या क्षमतेनुसार गाडी चालवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता गाडी चालवतांना ‘आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही’, याचा आनंदही मिळू लागला आहे.

३ आ. प्रवासानंतर गाडीची लगेचच स्वच्छता केली जाणे : आधी प्रवासामुळे गाडी खराब झाल्यावर तिची लगेच स्वच्छता करण्याचा विचार होत नव्हता. आता आमच्या मनात ‘आपण बाहेरून आल्यावर आपल्याला अंघोळ करायला आवडते, तसे त्या गाडीलाही वाटत असेल ना ?’, असा विचार होऊन ‘तिची लगेच स्वछता करावी’, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता ‘गाडी चालवतांना आमच्याकडून कार्य होत नसून सेवा होऊ लागली आहे’, असे वाटते.

३ इ. दैवी दौऱ्याच्या वेळी गाडीवरही वाईट शक्तींची आक्रमणे होत असून ‘तिनेही ते त्रास सहन केले आहेत’, याची जाणीव होणे

३ इ १. महर्षींनी ‘जिथे आहात, तिथेच थांबून १५ मिनिटे नामजप करा’, असा निरोप देणे : एकदा आम्ही चेन्नई ते देहली असा प्रवास करत होतो. त्या प्रवासाच्या वेळी आम्ही गुजरात येथे जात असतांना अकस्मात् विनायकदादांचा (श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)) यांचा भ्रमणभाष आला. तेव्हा ते नाडीवाचन ऐकत होते. त्यांनी आम्हाला भ्रमणभाष करून गाडी थांबवायला सांगून महर्षींचा निरोप दिला, ‘जिथे आहात, तिथेच थांबून १५ मिनिटे नामजप करा.’ त्याप्रमाणे आम्ही तिथेच थांबून १५ मिनिटे नामजप करून मग पुढे निघालो.

३ इ २. ‘गाडी आणि वाहनचालकाच्या बाजूच्या दोन्ही चाकांची झाकणे यांच्याभोवती दोरा गुंडाळला आहे आणि तो करणीचा प्रकार आहे’, असे लक्षात येणे : काही घंट्यांनंतर आम्ही राजस्थान येथे जात असतांना वाहनचालकाच्या बाजूच्या बाहेरच्या आरशाच्या बाजूकडे एक दोरी चिकटलेली दिसली. आम्ही गाडी थांबवून ती दोरी बघितली, तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘गाडीच्या चारही बाजूंनी कोणीतरी व्यवस्थित दोरी गुंडाळली होती. चालकाच्या दोन्ही बाजूच्या चाकांच्या झाकणांच्या भोवतीही दोरी गुंडाळली होती.’ नंतर गाडीला दोरी बांधली जाणे, हा करणीचा प्रकार असल्याचे समजले.

३ इ ३. महर्षींनी त्वरित गाडी थांबवायला सांगून नामजप करायला सांगितल्यामुळे ‘वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणाचा परिणाम झाला नाही’, असे श्री. विनायक शानभाग यांनी सांगणे : लगेचच आम्ही भ्रमणभाष करून विनायकदादांना याविषयी कळवले. तेव्हा महर्षींनी विनायकदादांना सांगितले, ‘‘साधक आणि गाडी यांवर आक्रमण होणार होते; पण त्या आधीच तुम्ही नामजप केल्यामुळे त्याचा परिणाम साधक किंवा गाडी यांवर झाला नाही.’’

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवर प्रेम करायला शिकता येणे

आमच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे सजीव गोष्टींविषयीही आमच्या मनात प्रेमभाव निर्माण होणे कठीण जायचे; पण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींविषयी आपल्या मनात प्रेमभाव कसा निर्माण झाला पाहिजे ?’, हे सातत्याने शिकवून आमच्याकडून तसे प्रयत्न करून घेतले. त्यामुळे आमच्यामध्ये गाडीविषयी प्रेमभाव निर्माण व्हायला साहाय्य झाले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळेच ते आम्हाला साध्य झाले.

५. गाडीकडे बघून समाजातील लोकांना आलेल्या अनुभूती

५ अ. वाहन देखभाल दुरुस्ती केंद्रातील कर्मचाऱ्याला या गाडीत वेगळाच सुगंध जाणवणे : समाजातील लोकांनाही या गाडीविषयी अनेक अनुभूती आल्या आहेत. आम्ही चेन्नई येथे वाहन देखभाल दुरुस्ती केंद्रामध्ये (सर्व्हिस सेंटरमध्ये) गाडीची नेहमी करावी लागणारी देखभाल करून घेण्यासाठी (सर्व्हिसिंगसाठी) गेलो होतो. त्या केंद्रातील कर्मचारी गाडीत बसताच म्हणाला, ‘‘या गाडीमध्ये छान सुगंध येत आहे. तुम्ही या गाडीमध्ये काही सुगंधी ठेवता का ?’’ आम्ही त्यांना संगितले, ‘‘आम्ही सुगंधी असे काहीही या गाडीमध्ये ठेवत किंवा लावत नाही; पण ही आमच्या सद्गुरूंची गाडी आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘या गाडीमध्ये येणारा सुगंध मी याआधी कधीच अनुभवला नाही.’’

५ आ. पेट्रोलपंपावरील महिला कर्मचाऱ्याने ‘तुमची गाडी आत येतांना मला कुंकवाचा सुगंध आला’, असे सांगणे : एकदा आम्ही प्रवासात असतांना एके ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी गाडी पेट्रोलपंपाच्या ठिकाणी आत घेतली. तेव्हा त्या ठिकाणी कामावर असलेली महिला कर्मचारी म्हणाली, ‘‘तुमची गाडी आत येत असतांना मला कुंकवाचा सुगंध आला. ही कोणाची गाडी आहे ? गाडीत कोण बसले आहे ?’’

५ इ. मार्गावरील लोक गाडीकडे एखादे वेगळे वाहन जात असल्याप्रमाणे टक लावून पहाणे : आमची गाडी मार्गावरून जात असतांना मार्गावरचे अनेक लोक आमच्या गाडीकडे टक लावून पहातात. जणूकाही ही कोणती तरी नवीनच किंवा विदेशातील गाडी पहिल्यांदाच भारतात आली आहे; पण तेव्हा आमच्या लक्षात येते, ‘ते लोक गाडीत असलेल्या चैतन्याकडे आकृष्ट होतात.’

६. एकदा या दैवी गाडीच्या संदर्भात श्रीचित्‌‌शक्ति सौ. गाडगीळ म्हणाल्या, ‘‘या गाडीच्या जागी एखादी साधिका असती, तर तिला ६१ टक्के (आध्यात्मिक पातळी) घोषित केले असते.’’

– श्री. विनीत देसाई आणि श्री. स्नेहल राऊत, चेन्नई, तमिळनाडू. (१.११.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक