राज्यातील सर्व शासकीय विभागांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त !

शासनाने रिक्त पदे तात्काळ भरावीत ! – अनिल गलगली

रिक्त पदांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. सरासरी २३ टक्के पदे रिक्त आहे. काही विभागांत तर ३० ते ५० टक्केपर्यंत पदे रिक्त आहेत. शासनाने तात्काळ ही रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यातील एकूण २९ शासकीय विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणारी विविध कार्यालये यांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सरकारच्या खात्यातील ही रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्यातील सर्व विभागांत मिळून १० लाख ७० सहस्र ८४० पदे आहेत. यांतील ८ लाख २६ सहस्र ४३५ पदे भरलेली आहेत. अनिल गलगली यांनी ११ मे २०२२ या दिवशी माहितीच्या अधिकाराखाली संमत पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे ही माहिती मागितली होती. यामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार गृह विभागामध्ये एकूण २ लाख ९२ सहस्र ८२० पदे संमत आहेत; मात्र त्यातील ४६ सहस्र ८५१ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण ६२ सहस्र ३५८ पदे संमत असून त्यापैकी २३ सहस्र ११२ पदे रिक्त आहेत. जलसंपदा विभागाच्या ४५ सहस्र २१७ संमत पदांपैकी २१ सहस्र ४८९ पदे रिक्त आहेत.

संपादकीय भूमिका

  • शासकीय कार्यालयांतील लाखो पदे रिक्त ठेवणारे अकार्यक्षम प्रशासन जनहित कधीतरी साधू शकेल का ?