|
नवी मुंबई, २५ मे (वार्ता.) – गोरबंजारा धर्मपिठाच्या कंठवली येथे बांधण्यात येणारे शक्तीपीठ मंदिराच्या परिसरातील भक्तनिवास अनधिकृत ठरवून सिडकोने पाडून टाकले. या प्रकरणी बंजारा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यामुळे गोरबंजारा धर्मपिठाचे १०० संत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याविषयी गोरबंजारा धर्मपिठाकडून २५ मे या दिवशी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले असून त्यांच्या भेटीची वेळही मागितली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील ३०० वर्षांपासून कंठवलीशी बंजारा समाजाचा धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. या परिसरात बांधण्यात आलेले भक्तनिवास अनधिकृत ठरवून सिडकोने पाडून टाकले. या प्रकरणी बंजारा समाजाच्या पोहरागड या धार्मिक स्थळी संत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत सरकार आणि सिडको यांच्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या सर्व विषयाची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
… अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभारू !
मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही, तर बंजारा समाजाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी घंटानाद आंदोलन करून आदिशक्ती मातेला मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देण्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी गांभीर्याने घेतली नाही, तर सिडकोच्या संबंधित अधिकार्यांच्या निलंबनासाठी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले, तर बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्रातील ३० विधानसभा क्षेत्रांतील आमदारांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतरही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर बंजारा समाज येणार्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालेल, अशी चेतावणी गोरबंजारा धर्मपिठाकडून देण्यात आली आहे.
अन्यथा मंत्र्यांना घेराव घालू !
संतांच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास बंजारा समाजाकडून मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल. त्यानंतरही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सिडकोवर विशाल मोर्चा नेण्यात येईल. या वेळी कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला सिडको प्रशासन उत्तरदायी असेल, अशी चेतावणीही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून गोरबंजारा धर्मपिठाकडून देण्यात आली आहे.