(म्हणे) ‘कुतूबमिनार मंदिरांच्या अवशेषांपासून बनवलेले आहे !’ – इतिहासकार इरफान हबीब

नवी देहली – कुतूबमिनारचा इतिहास कुतूबमिनार स्वतः सांगतो आणि त्यावर सर्व काही लिहिलेले आहे. हे मंदिरांच्या अवशेषांपासून बनलेले आहे. कशाच्या खाली काय आहे कुणास ठाऊक ? जामा मशिदीखाली काहीतरी असल्याचे सांगितले जात आहे. आता अशा सर्व संरचना नष्ट करा. ताजमहाल आणि लाल किल्ला नष्ट करा. जामा मशीद पाडा आणि बघा जे मिळेल ते समोर येईल, असे विधान लेखक आणि इतिहासकार एस्. इरफान हबीब यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.

इरफान हबीब यांनी मांडलेली सूत्रे

मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या !

मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या, हे इतिहासाने कधीच नाकारले नाही. या सर्व गोष्टींची इतिहासात नोंद आहेत. जे दावे केले जात आहेत, ते पहिल्यांदाच कळत आहेत. हे सर्व बनावट आहे. एकदा संपूर्ण बांधकाम पाडले पाहिजे. सर्व काही बाहेर येईल. इतका वाद घालण्याची आवश्यकता नाही. (हबीब हे सर्व मुसलमान पक्षकारांना का सांगत नाहीत ? – संपादक)

अधिकार दाखवण्यासाठी औरंगजेब मंदिरे पाडून मशीद बांधायचा !

सर्व काही पहिल्यांदाच सांगितले जात आहे, हा दावा खोटा आहे. मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्याचे पुरावे इतिहासकारांना मिळाले आहेत. आपण इतिहास पाहिल्यास लक्षात येईल की, औरंगजेबाचे अनेक फर्मान आहेत, ज्यांत इतिहासकारांनी असेही लिहिले आहे की, मंदिरे पाडून त्याजागी मशिदी बांधल्या गेल्या; कारण औरंगजेब अधिकार दाखवण्यासाठी मंदिरे पाडून मशीद बांधायचा. (अधिकार दाखवण्यासाठी नाही, तर हिंदूंवर आघात करण्यासाठी, तसेच त्यांना खिजवण्यासाठी औरंगजेब मंदिरे पाडत होता, हा खरा इतिहास आहे ! – संपादक)

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग नाही, तर कारंजेच !

ते शिवलिंग कसे असू शकते. ४०० वर्षांपासून ज्ञानवापी मशीद चालू असतांना ते कसे राहिले. मुसलमानांना हवे असते, तर ते शिवलिंग नष्ट करू शकले असते, म्हणजेच मुसलमानांनी त्याचा फार आदर केला आणि सांभाळले. (मोगलांना ते शिवलिंग नष्ट करता आले नाही त्यामुळे त्यांनी तेथे हात-पाय धुण्याची, चूळ भरण्याची जागा बनवून त्याचा कायमचा अवमान होईल, अशी स्थिती निर्माण केली, हा इतिहास आणि वर्तमान आहे, हे हबीब का सांगत नाहीत ? – संपादक) ते शिवलिंग नाही. ते केवळ एक कारंजा आहे. मोठ्या मशिदींमध्ये सर्वत्र कारंजे आढळतील. मशिदीमध्ये वजूसाठी (नमाजापूर्वी हात-पाय धुणे) एक जागा बनवली आहे. सुशोभीकरणासाठी कारंजे बसवली आहेत. (४०० वर्षांपूर्वी कारंजे अस्तित्वात होते का ? तेव्हा वीज होती का ? ज्ञानवापीतील शिवलिंगाजवळ कारंजे चालू होण्याच्या संदर्भात काहीही आढळून आलेले नाही, हे हबीब का सांगत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

कुतूबमिनार कोणत्याही अवशेषपासून बनवलेले नसून ते पूर्वीच हिंदु राजाने बांधलेली मूळ संरचनाच आहे. तो इतिसहाकार आणि पुरातत्व तज्ञ ‘सूर्यस्तंभ’ असल्याचे सांगत आहेत. त्याच्या परिसरातील २७ मंदिरे पाडण्यात आली असून त्याच्या अवशेषशंपासून तेथे मशीद बांधण्यात आली असल्याचा इतिहास आहे, हे हबीब का सांगत नाहीत ?