संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक, तसेच ‘संतूर’ या वाद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा (वय ८४ वर्षे) यांचे १० मे या दिवशी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले, ‘‘पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. जगभरात जेथे भारतीय संगीत पोचले आहे, तेथेे संतूर पोचले आहे, हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. त्यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापि विसरता येणार नाही. पं. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूंपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली !’’राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही पंडित शिवकुमार शर्मा यांनी श्रद्धांजली वाहिली.