नागपूर येथे ‘पासवर्ड हॅक’ करून शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक !

  • २ कोटी ८० लाख रुपयांपैकी ५ लाख ८० सहस्र रुपयांची वसुली !

  • नागरिकांनो, सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सतर्कता आणि सावधगिरी बाळगा !

नागपूर – भ्रमणभाषवर आलेला ओटीपी, तसेच फेक खात्यामुळे शहरात २०२० आणि २०२१ या २ वर्षांत २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रत्यक्षात त्यांतील ५ लाख ८० सहस्र रुपयांची वसुली झाली आहे. भ्रमणभाषवर अनेकदा ओटीपी क्रमांक येतो. त्यात मागवलेली माहिती दिल्यामुळे फसवणूक होते. अनेकदा फेक खात्यांमुळे (अकाऊंटमुळे) आर्थिक हानी होती.

१. वर्ष २०२० मध्ये ‘ओटीपी’मुळे आर्थिक फसवणूक झाल्याची २१० प्रकरणे झाली, तर ‘पासवर्ड हॅकिंग’मुळे ७० जणांची फसवणूक झाली. यात एकूण १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाली, तर वसुली मात्र २ लाख ६५ सहस्र रुपये झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये ‘ओटीपी’मुळे आर्थिक फसवणूक झाल्याची २९० प्रकरणे झाली, तर ‘पासवर्ड हॅकिंग’मुळे ४० जणांची फसवणूक झाली आहे. यात १ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक झाली, तर ३ लाख १५ सहस्र रुपयांची वसुली झाली आहे.

२. ‘फसवणूक होऊ नये; म्हणून मजबूत आणि सुरक्षित ‘पासवर्ड’ असणे महत्त्वाचे आहे. ‘पासवर्ड’ काही आठवड्यांनी किंवा मासांनी एकदा पालटला पाहिजे. ‘ऑनलाईन अकाऊंट’ची पुनर्पडताळणी करायला हवी. तसे होत नसल्यामुळे सायबर गुन्हेगार याचा लाभ घेतात. ते असे अकाऊंट २-३ मास वापरून बंद करतात’, अशी माहिती नागपूर ‘सायबर सेल’चे पोलीस निरीक्षक संजय पंडागळे यांनी दिली.