हरियाण पोलिसांनी बग्गा यांना देहली पोलिसांकडे सोपवले !

देहलीतील भाजपचे नेते बग्गा यांना अटक करून घेऊन जाणार्‍या पंजाब पोलिसांना भाजपशासित हरियाणा राज्यातील पोलिसांनी रोखले !

डावीकडे भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा

कुरुक्षेत्र (हरियाणा) – देहलीमधील भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा यांना पंजाब येथील पोलीस अटक करून पंजाबमध्ये नेत असतांना हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले. तसेच बग्गा यांना कह्यात घेतले. तसेच पंजाब पोलिसांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. यानंतर देहली पोलीसही बग्गा यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून कुरुक्षेत्र येथे पोचले. हरियाणा पोलिसांनी बग्गा यांना त्यांच्या नियंत्रणात दिल्यानंतर देहली पोलीस पुन्हा देहलीच्या दिशेने निघाले. तत्पूर्वी याविषयी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, हरियाणा पोलीस बग्गा यांना पंजाब पोलिसांकडून सोडवून देहली पोलिसांकडे सोपवणार आहे; कारण बग्गा यांचे अपहरण करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर हरियाणा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

१. पंजाब पोलिसांचे म्हणणे होते की, हे प्रकरण अपहरणाचे नाही. बग्गा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.

२. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार पंजाब पोलिसांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून गुन्ह्याची माहिती दिली आहे आणि याची प्रतही सादर केली आहे.

३. तत्पूर्वी पहाटे ५ वाजता बग्गा यांना पंजाब पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. या वेळी सुमारे ५० पोलीस उपस्थित होते. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातील घटना देहलीत झाली होती, तर गुन्हा पंजाबच्या मोहालीमध्ये नोंदवण्यात आला होता. यापूर्वी २ एप्रिल या दिवशी पंजाब पोलीस बग्गा यांना अटक करण्यास आले होते. त्या वेळी पोलिसांनी बग्गा यांना गुन्हा नोंदवल्याची कागदपत्रे आणि अटक वॉरंट दाखवले नव्हते. त्यामुळे बग्गा यांनी त्यांना अटक करण्यास विरोध केला होता. त्यानंतर पोलीस माघारी गेले होते.

४. अटक करतांना बग्गा यांच्या वडिलांनी विरोध केला असता त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बग्गा हे शीख आहेत; मात्र त्यांना पगडी बांधायलाही दिली नाही आणि त्याच स्थितीत त्यांना नेण्यात आले. त्यामुळे हे अपहरण आहे, असाही आरोप बग्गा यांच्या कुटुंबियांनी केला होता, तसेच येथील जनकपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

काय आहे प्रकरण ?

डावीकडून भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देहलीच्या विधानसभेत ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून बोलतांना काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार खोटा असल्याचे म्हटले होते. यावरून ३० मार्च २०२२ या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. या वेळी बग्गा म्हणाले होते, ‘सोनिया गांधी यांनी भगवान श्रीरामाचे अस्तित्व नाकारले होते. आज त्यांचा पक्ष संकटात आहे. यामुळेच केजरीवाल यांना सांगू इच्छितो की, देशात हिंदू तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. केजरीवाल यांनी क्षमा मागितली पाहिजे, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना सुखाने राहू देणार नाही. आमचे आंदोलन चालू राहील.’ या भाषणावरून बग्गा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.