३ लाख रुपयांची लाच घेतांना संभाजीनगर महापालिकेच्या गुंठेवारी कक्षप्रमुखांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महापालिका प्रशासन !

संभाजीनगर – एका बांधकाम व्यावसायिकाचे इमारतीचे काम चालू करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून ‘ले आऊट’ संमत करण्यासाठी येथील महापालिकेतील गुंठेवारी कक्ष प्रमुख आणि शाखा अभियंता संजय चामले यांनी तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी २९ एप्रिल या दिवशी चामले यांना त्यांच्या घरीच पकडले. चामले यांना अटक करण्यात आली आहे. रात्री विलंबापर्यंत चामले यांच्या घराची झडती चालू होती. या प्रकरणी येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

साहेबांचेही पहावे लागते ! – चामले

‘पैसे देऊनही आपले काम का होत नाही ?’, अशी विचारणा तक्रारदाराने संजय चामले यांना केली, तेव्हा ‘माझे काही नाही. साहेबांचेही पहावे लागते’, असे त्यांनी तक्रारदाराला उत्तर दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासमोरही चामले यांनी काही अधिकार्‍यांची नावे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. (यावरून महापालिकेत भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे स्पष्ट होते. महापालिकेत खालपासून वरपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या साखळीत संबंधित दोषी वरिष्ठ अधिकार्‍यांनाही अटक केली पाहिजे. – संपादक) विशेष म्हणजे याच तक्रारदाराकडून यापूर्वी एका प्रकरणात चामले यांनी १० लाख रुपये घेऊनही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वैतागून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती आहे.