श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी जिना उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन
पुणे – अनेक अडथळे पार करून येथे जिना उभारण्यात यश येत आहे. त्यामागे ब्राह्मण महासंघाचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. आपल्या राष्ट्रपुरुषांचे स्मारक आणि पुतळे यांची योग्य निगा राखली जावी अन् तेथील पावित्र्य जपले जावे यांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. २८ एप्रिल या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या २८२ व्या पुण्यतिथीला शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी जिना उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनपा साहाय्यक आयुक्त, महासंघाचे पदाधिकारी मनोज तारे यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्राह्मण महासंघाने स्वतःच्या निधीतून शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला जीना उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महासंघाचे पदाधिकारी अन् मनपा प्रशासन यांच्या समवेत बैठक आयोजित करून जिना उभारण्याची घोषणा केली. या वेळी वचनपूर्ती केल्याबद्दल मुरलीधर मोहोळ आणि संदीप खर्डेकर यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापौरांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वहाण्यात आली.
या वेळी आनंद दवे म्हणाले, ‘‘यापुढील काळात ब्राह्मण महासंघ ‘ब्राह्मण समाजभूषण’ असणाऱ्या सर्व महापुरुषांच्या स्मृती जतन करेल आणि ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी कार्य करेल.’’
संदीप खर्डेकर यांनी ब्राह्मण महासंघाच्या कार्याचा गौरव केला. मराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पान मुद्रांकित करणारे अपराजित योद्धा बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जिना उभारणीस प्रारंभ होत असून येत्या ३ दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.