१३.७.२०२२ या दिवशी होणाऱ्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’साठी ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत सभागृह आरक्षित करा !

जिल्हासेवकांसाठी महत्त्वाची सूचना

‘१३.७.२०२२ या दिवशी व्यास पौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. शिष्याची मोक्षाकडे वाटचाल करणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व नेहमीपेक्षा सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित केले जातात.

१. जिज्ञासूंच्या सोयीचा विचार करून सभागृहाचे आरक्षण करा !

सनातनच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांना लाभणारा जिज्ञासूंचा प्रतिसाद पहाता कार्यक्रमासाठी आतापासून सभागृहाचे आरक्षण करणे आवश्यक आहे, अन्यथा जिज्ञासूंना सोयीचे होणारे सभागृह मिळण्यात अडचणी येतात. जिल्हासेवकांनी आपापल्या जिल्ह्यातील गुरुपौर्णिमांच्या सभागृहांचे आरक्षण ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत करावे.

२. सभागृह निवडतांना लक्षात घ्यायची सूत्रे !

२ अ. महत्त्वाचे निकष

१. जिज्ञासूंना येण्यास सोयीचे होईल, असे सभागृह निवडावे.

२. कार्यक्रमाला उपस्थित रहाणाऱ्या जिज्ञासूंच्या संख्येचा विचार करून तेवढी क्षमता असलेल्या सभागृहाची निवड करावी.

३. सभागृह वा परिसर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन, तसेच अन्य कक्ष उभारणीसाठी पुरेशी जागा असावी.

४. सभागृहाच्या बाहेरील परिसरात पादत्राणे ठेवण्याची आणि प्रसाधनगृहाची सुविधा असावी. साधक आणि जिज्ञासू यांच्या छत्र्या अन् रेनकोट ठेवण्यासाठीही तेथे जागा असावी.

५. वाहने उभी करण्यासाठी सोय होऊ शकते का? असे पहावे.

६. कार्यक्रमस्थळी ‘एअरटेल’, ‘आयडिया’ आदींपैकी कोणत्या ‘सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यां’ची ‘रेंज’ येते, याचा अवश्य अभ्यास करावा. भ्रमणभाष आणि ‘इंटरनेट’ या दोन्हींची ‘रेंज’ येत असल्यास कार्यक्रमस्थळी उपस्थित साधक अन् प्रसारसेवा करणारे साधक यांना एकमेकांशी समन्वय ठेवणे सोयीचे जाते.

७. सभागृहातील दिवे आणि पंखे चालू स्थितीत आहेत ना? हे पहावे.

२ आ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पावसाळ्यात होत असल्याने पुढील बारकावे लक्षात घेणे आवश्यक !

१. सभागृह आणि परिसरात पावसाचे पाणी येत नाही ना, तसेच सभागृहात पाण्याची गळती नाही ना, याची निश्चिती करावी.

२. सभागृहावर पत्र्याचे छप्पर असेल आणि कार्यक्रमाच्या वेळी पाऊस पडला, तर पावसाचे पाणी पत्र्यावर जोराने पडून मोठा आवाज होतो. त्यामुळे कार्यक्रमातील विषय ऐकण्यात जिज्ञासूंना व्यत्यय येतो. हे टाळण्यासाठी पहाणी करून सभागृहाची निवड करावी.

३. काही सभागृहात प्रतिध्वनी (इको) ऐकू येतो. त्यामुळे कार्यक्रमातील विषय सर्वांना नीट समजत नाही. साधकांनी सभागृहात प्रतिध्वनी येत नाही ना? हे पहावे.

वर दिलेले निकष, तसेच स्थानिक स्थितीनुसार अन्य काही बारकावे असल्यास त्यांचा अभ्यास करून सभागृह निश्चित करावे. यात काही अडचणी येत असल्यास जिल्हासेवकांनी उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घ्यावे.’ (२६.४.२०२२)