गुरुसेवेचा ध्यास असलेले देहली येथील श्री. श्रीराम लुकतुके (वय ४२ वर्षे) !

चैत्र शुक्ल दशमी (११.४.२०२२) या दिवशी श्री. श्रीराम लुकतुके यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अवनी लुकतुके यांना श्री. श्रीराम लुकतुके यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

श्री. श्रीराम लुकतुके

श्री. श्रीराम लुकतुके यांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. तत्त्वनिष्ठता

‘माझे यजमान माझी, राघवची (मुलगा (वय १३ वर्षे)) किंवा त्यांच्या आईची चूक तत्त्वनिष्ठपणे सांगतात.

२. पत्नीला समजून घेणे

एकदा मी यजमानांना भ्रमणभाषवरून एक प्रसंग सांगितला. तेव्हा तो ‘समष्टीच्या दृष्टीने कसा घातक होऊ शकतो ?’, हे त्यांनी मला नेमकेपणाने समजावून सांगितले. आम्हा दोघांमध्ये बोलतांना कधी मतभेद झाले, तर वादविवाद न करता ते मला समजून घेतात आणि ‘योग्य काय आहे ?’ ते मला शांतपणे समजावून सांगतात.

३. गुरुसेवेचा ध्यास असणे

यजमानांनी एकदा सेवेला आरंभ केला की, त्यांना व्यावहारिक आणि वैयक्तिक सर्वच गोष्टींचा विसर पडतो. एकदा माझ्या माहेरचे सर्व कुटुंबीय एकत्र जमलो होतो. तेव्हा सगळे जण असल्याने यजमानांना ‘सत्संग घेणे किंवा आढावा घेणे’ अशा सेवा करता येत नव्हत्या; परंतु त्यांनी उपलब्ध वेळेत ‘मी अन्य कोणत्या सेवा करू शकतो ?’, याविषयी विचारून घेऊन सेवा केली.

४. सद्गुरु, संत आणि सर्व साधक यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणे

आम्ही पूर्णवेळ साधना करायला आरंभ केल्यावर यजमानांना चेन्नई, रामनाथी, मुंबई आणि देहली या ठिकाणी रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा तेथील सद्गुरु, संत आणि साधक यांनी यजमानांना घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यासाठी त्यांच्या मनामध्ये अखंड कृतज्ञताभाव असतो. ‘ते बोलत असतांना भावावस्थेत आहेत’ आणि ‘त्यांची ती अवस्था पुष्कळ वेळ टिकून रहाते’, असे मला वाटते.

५. जाणवलेला पालट

५ अ. नम्रता : पूर्वी यजमानांना आध्यात्मिक त्रासामुळे लगेच राग यायचा. काही प्रसंगांत त्यांची पुष्कळ चिडचिडही व्हायची आणि ते अधिकारवाणीने बोलत असत; परंतु आता त्यांच्या बोलण्यात पालट जाणवतो. आता ते सर्वांशी नम्रतेने बोलतात. आमच्याकडे ते ‘साधक या नात्याने नम्रतेने बोलतात’, असे मला जाणवते.

‘हे गुरुदेवा, यजमानांमध्ये असलेले गुण माझ्यामध्ये आणण्यासाठी माझ्याकडून तळमळीने प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. अवनी श्रीराम लुकतुके, केरळ (मार्च २०२२)