वाईट शक्ती साधकांची पंचज्ञानेंद्रिये स्वत:च्या कह्यात घेण्यासाठी साधकांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक (काळे) आवरण निर्माण करतात. त्यामुळे साधकांचा तोंडवळा काळपट दिसणे, तोंडवळ्याची कड अस्पष्ट दिसणे, डोळ्यांची आग होणे, तोंडवळ्यावर पुरळ येणे, तोंडवळ्यावर काळे डाग पडणे किंवा तोंडवळा निस्तेज किंवा थकलेला दिसणे यांसारखे त्रास जाणवतात. यावरून साधकांच्या तोंडवळ्यावर पाताळातील वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमणे केल्यामुळे तोंडवळ्यावर त्रासदायक आवरण आलेले आहे’, हे लक्षात घ्यावे. यासाठी साधक पुढीलप्रमाणे प्रक्रिया स्थुलातून करून स्वत:च्या तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.
१. चहाचा १ किंवा पाऊण चमचा सनातन-निर्मित उटणे एका वाटीत घ्यावे.
२. त्यामध्ये चहाचा अर्धा चमचा खोबरेल तेल घालावे.
३. या मिश्रणात अर्धा चमचा गोमूत्र घालावे.
४. या मिश्रणात लहानशी कापराची वडी बोटांनी दाबून तिची बारीक पूड घालावी.
५. या सर्व घटकांना बोटाने ढवळून त्यांचे मिश्रण एकजीव करावे.
६. तोंडावर पाणी मारून नंतर वरील प्रमाणे सिद्ध केलेले उटण्याचे मिश्रण संपूर्ण तोंडाला लावावे.
७. मिश्रण लावून झाल्यानंतर श्रीकृष्णाला किंवा उपास्य देवतेला ‘स्वत:च्या तोंडवळ्यावरील त्रासदायक शक्तीचे संपूर्ण आवरण नष्ट होऊ दे’, अशी प्रार्थना करावी.
८. त्यानंतर ३ ते ५ मिनिटांनंतर तोंडवळा स्वच्छ पाण्याने धुवावा.
अशा प्रकारे स्वतःला बरे वाटेपर्यंत, म्हणजे २ – ३ आठवडे उटण्याने तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे तोंडवळ्यावरील संपूर्ण त्रासदायक आवरण नष्ट होऊन मनाला हलकेपणा, उत्साह आणि आनंद जाणवतो. वरीलप्रमाणे तोंडवळ्यासाठी केलेले उपाय देहातील सप्तकुंडलिनीचक्रांवरील त्रासदायक आवरण दूर करण्यासाठीही करू शकतो.
कृतज्ञता
देवाच्या कृपेने सुचलेला हा उपाय मी गेले ३ – ४ मास करत आहे. त्यामुळे मला पुष्कळ प्रमाणात लाभ झालेला आहे. हा उपाय सुचवल्याबद्दल मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२२)
|