व्यष्टी आणि समष्टी साधना चिकाटीने करणार्‍या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील कु. शीतल पवार (वय ३५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बार्शी (जिल्हा सोलापूर), – सातत्य, चिकाटी, नम्रता या दैवी गुणांची खाण असणार्‍या, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ असणार्‍या कु. शीतल पवार (वय ३५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११३ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी एका अनौपचारिक सत्संगात दिली. साधकांसाठी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ही वार्ता साधकांना देण्यात आली.

कु. शीतल पवार यांचा सत्कार करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (डावीकडे)

या कार्यक्रमामध्ये कु. शीतल यांचे आई-बाबा प्रत्यक्ष उपस्थित होते, तर भाऊ श्री. अतुल पवार, वहिनी पू. (सौ.) अश्विनी पवार, बहीण सौ. वेदिका जगताप हे सर्वजण ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या वेळी आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. उल्का जठार यांच्यासह अन्य साधकही उपस्थित होते. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी कु. शीतल यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला.

व्यष्टी साधनेचे प्रयत्न गुरुदेवच करून घेत आहेत, असे वाटते ! – कु. शीतल पवार 

कु. शीतल पवार

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वातीताई, पू. (कु.) दीपालीताई, पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता ! मला याआधी सेवेचा ताण येत असे; मात्र आता तो येत नाही. व्यष्टी साधना नियमित होते, तसेच व्यष्टी साधनेचे प्रयत्न गुरुदेवच करून घेत आहेत, असे वाटते. मागील काही दिवसांपासून मला ‘आध्यात्मिक प्रगती झाली आहे’, असे जाणवत होते, तसेच आज ‘माझी प्रगती झाली आहे, हे घोषित करतील’, असेही जाणवत होते. ‘कशी होऊ उतराई गुरुराया, कशी होऊ मी उतराई’, असे म्हणतांना कु. शीतल यांचा भाव जागृत झाला होता.

नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत

कु. शीतलला साधनेची आवड आहे ! – सौ. मंदाकिनी पवार (कु. शीतलच्या आई)

कु. शीतल लहानपणापासूनच शांत आहे. संतांप्रमाणे ती जीवन जगते. ती सर्वांशीच जिव्हाळ्याने आणि आपुलकीने वागते, त्यामुळे ती साधकांसह नातेवाइकांनाही हवीहवीशी वाटते.

कु. शीतल पुष्कळ तत्त्वनिष्ठ आहे ! – केशव पवार (कु. शीतलचे वडील)

कु. शीतल पुष्कळ तत्त्वनिष्ठ आहे. ती अनेक वेळा माझ्या चुकाही तत्वनिष्ठपणे सांगते. ती प्रामाणिक आणि प्रांजळ असून कधीच कुणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. ती सेवेला कधीच कुणाला ‘नाही’ म्हणत नाही.

कु. शीतलची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे ! – श्री. अतुल पवार (कु. शीतलचा भाऊ), सनातन आश्रम, देवद, पनवेल

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर तिची पुष्कळ श्रद्धा आहे. तिला प्रवास करतांना पुष्कळ शारीरिक त्रास होतो; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आश्रम पहाण्यासाठी ती प्रवास करून रामनाथी आश्रमामध्ये गेली होती आणि तेथे काही दिवस राहून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकून घेतली.

ताईच्या सहवासात चैतन्य मिळत असल्याचे जाणवते ! – सौ. वेदिका जगताप, (कु. शीतलची बहीण), सांगली

काही दिवसांपूर्वी मी तिच्या सहवासात रहात असतांना चैतन्य मिळत असल्याचे जाणवत होते. व्यष्टी साधनेचे तिचे प्रयत्न पाहून तिची प्रगती झाली असणार असे जाणवत होते. माझा मुलगा कु. अवधूत जगताप (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यालाही ताईच्या (मावशीच्या) सहवासात आनंद जाणवत होता. ‘ताई आणि अवधूत यांचे आध्यात्मिक नाते आहे’, असे जाणवते.

व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली असल्याने कु. शीतल पवार यांची लवकर आध्यात्मिक प्रगती झाली ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये

या वेळी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘मागील १५ दिवसांपूर्वी कु. शीतलला पू. (कु.) दीपाली मतकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यानंतर तिने व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले. ती जी काही सेवा करते ती मनापासून करते, तसेच तिचे बोलणेही आध्यात्मिक स्तरावरचे असते. तिची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली असल्याने लवकर आध्यात्मिक प्रगती झाली आहे.’’

कु. शीतल यांना भौतिक वस्तूंचे आकर्षण नाही ! – पू. (सौ.) अश्विनी पवार (कु. शीतलच्या भावजय), सनातन आश्रम, देवद, पनवेल

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

कु. शीतल माझ्या नणंद आहेत; मात्र आमच्यात आध्यात्मिक नाते अधिक आहे. त्यांच्या बोलण्यात चैतन्य जाणवते. त्या दूरभाषवर बोलतांना प्रारंभी ‘नमस्कार’ म्हणतात, तेव्हा तो शब्द अंतर्मनापर्यंत पोचतो. अन्य वेळीही त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात साधकत्व जाणवते. मी घरी आले तरी त्या मायेतील विषयावर कधीही बोलत नाहीत, तर केवळ साधनेविषयीच बोलतात. त्यांच्यात अहंचे प्रमाण अल्प असून भौतिक वस्तूंचे आकर्षण नाही. मिळेल त्या गोष्टीत त्या समाधानी असतात.

चिकाटी, नम्रता आदी गुणांच्या साहाय्याने कु. शीतल यांची आध्यात्मिक प्रगती झाली ! – पू. (कु.) दीपाली मतकर

पू. (कु.) दीपाली मतकर

कु. शीतलताई प्रेमळ आणि नम्र आहे. तिला कधीच कुणाविषयी राग येत नाही. ती अखंड लीन आणि नम्र भावात असते. सेवेच्या दृष्टीने ती कार्यपद्धतीचे पालन तंतोतंत करते. तिच्यामध्ये असलेल्या सातत्य, चिकाटी, लीनता, नम्रता या दैवी गुणांच्या साहाय्याने तिने आध्यात्मिक प्रगती करून घेतली आहे.