डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)
१. संगीत शिकण्यामागील हेतू
संगीत शिकण्यामागे तीन हेतू असू शकतात – एक स्वतःचा आत्मिक अथवा आध्यात्मिक विकास, दुसरा पैसा आणि प्रसिद्धी मिळवणे अन् तिसरा म्हणजे संगीताविषयीचे शिक्षण देऊन संगीताचा प्रसार आणि प्रचार करणे. हे तीन मार्ग अगदी वेगळे अन् वेगवेगळ्या दिशांना जाणारे आहेत. एक मार्ग निवडला की, दुसर्या मार्गावर शक्यतो जाऊ नये.
१ अ. संगीतातून आत्मिक अथवा आध्यात्मिक विकास साधणे : ‘आत्मिक विकास म्हणजे काय ?’, हे आपण समजून घेऊ. आपल्या प्रत्येकात (प्रत्येक माणसात) काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि दंभ (अहंकार) हे सहा स्वभावदोष (षड्रिपू) असतात. संगीत शिकल्यामुळे आणि संगीताची आराधना, उपासना केल्यामुळे यांतील एकेक दोष गळून पडतो, मन शांत होते अन् भावनांचे कल्लोळ नाहीसे होतात. ‘हे जग नश्वर आहे’, या सत्याची जाणीव होते. संगीतातील राग गायल्याने क्रोध (राग) येणे न्यून होते. लोभ आणि मोह अंतरात निर्माण होणे घटत जाते. यामुळे आपोआप अहंभाव न्यून होतो आणि संगीत साधना करणारा साधक एक वेगळीच अद्भुत अनुभूती घेतो; परंतु जेव्हा तो स्वतःचे स्वतःसाठी गायन करतो, तसेच जे आवडते, तेच गातो, तेव्हाच हे सगळे साधते. लोकांना त्याचे गायन अथवा कलाविष्कार आवडेलच, असे नाही; पण हा साधक ‘लोकांना काय आवडेल ?’, याचा विचारही करत नाही. तो ‘स्वान्तः सुखाय’, म्हणजे स्वतःच्या सुखासाठी अथवा आनंदासाठी आयुष्यभर गात रहातो.
१ आ. संगीतातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लागल्याने कलाकाराचे आत्मिक समाधान हरवणे : दुसरा मार्ग म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी यांचा मार्ग. यात गायक ‘लोकांना काय आवडेल ?’, याचा जास्त विचार करतो. तो स्वतःला आवडणारे अल्प प्रमाणात गातो. त्यामुळे त्याची आंतरिक घुसमट होते. लोकांसाठी गायचे असल्याने तो ती घुसमट सहन करतो; कारण लोकांना आवडणारे गायले, तरच पैसा आणि प्रसिद्धी मिळणार असते. यात त्याच्या कलेचा स्तर किंचित घसरतो; कारण त्याला स्वतःला आवडणारे गाणे आयुष्यात अल्प वेळा गाता येते. यात त्याचे आत्मिक समाधान हरवते.
१ इ. संगीताचा प्रसार आणि प्रचार करणे : तिसरा मार्ग म्हणजे संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कटीबद्ध होणे. यात ‘प्रामाणिकपणा, विषयाचे सखोल ज्ञान, ज्ञान देण्याचे कौशल्य, ज्ञान देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि संयम’ या गुणांची नितांत आवश्यकता असते. ‘विद्यार्थी घडवणे’, ही फार मोठी कला आहे. हे कुणालाही जमण्यासारखे काम नाही. शिक्षकही जन्माला यावा लागतो. याला मराठीत ‘हाडाचा शिक्षक’, असे म्हणतात. शिक्षक ‘तानसेन’ आणि ‘कानसेन’ या दोन प्रकारच्या शिष्यांना सिद्ध करतो. ‘संगीतासाठी कान सिद्ध करणे आणि संगीतासाठी गळा सिद्ध करणे’, हे काम शिक्षकच करू शकतो.
२. कलाकाराने विचार करून वरीलपैकी एक मार्ग स्वीकारावा आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने दमदारपणे वाटचाल करावी !
‘संगीत कशासाठी शिकायचे ?’, हे प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी पक्के करणे महत्त्वाचे आहे. ‘दोन्ही गोष्टींचा (आत्मिक समाधान आणि प्रसिद्धी यांचा) लाभ मिळणार नाही’, हे मात्र पुरते ध्यानात ठेवले पाहिजे. जो मार्ग निवडला, त्या मार्गावर चालत चालत आपले ध्येय गाठणे फार आवश्यक आहे. प्रत्येक मार्गावरील लाभ आणि हानी स्वीकारली पाहिजे. एकदा एक मार्ग निवडला की, पूर्ण सिद्धतेनिशी आणि कोणतेही गार्हाणे (तक्रार) न करता ध्येयपूर्तीच्या दिशेने दमदारपणे वाटचाल केली पाहिजे.
तेव्हा संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांनी शिकण्यापूर्वी आपला संगीत शिकण्यामागचा हेतू मनात स्पष्ट करून घ्यावा. यासाठी आपले गुरुजन आणि पालक यांसह चर्चा करावी, स्वतः आत्मचिंतन करावे अन् मगच संगीत शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ करावा.
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (८.६.२०२१)