१. पूजा ही विविध प्रकारांनी केली जाते. त्यात स्वतःचे प्राप्त कर्तव्य म्हणून केलेले नित्यकर्म, पूजा, मंत्र, जप, होमहवन, नामसंकीर्तन, गीतगायन, वेदपारायण, पुराणवाचन, मंदिर सजवणे, मंदिरापुढे सडासमार्जन करणे, सुगंधी द्रव्यासह रांगोळ्या काढणे, दिव्याची आरास करणे इत्यादी अनेक प्रकारांनी स्वतःच्या उपास्यदेवतांची उपासना करता येते.
२. अगस्तीऋषींनी प्रभु श्रीरामचंद्र यांना सांगितलेले उपासनेचे ३ प्रकार
अ. श्रद्धेने, भक्तीने, यथाविधी आणि निष्काम प्रकृतीने उपास्यदेवतेला संतुष्ट करण्यासाठी केलेल्या उपासनेला ‘सात्त्विक उपासना’ असे म्हणतात.
आ. तीच उपासना श्रद्धेने, भक्तीने आणि यथाविधीने मनात फलप्राप्ती धरून केल्यास ती ‘राजस उपासना’ होते.
इ. श्रद्धाहीन, भक्तीहीन आणि विधीहीन या स्तरांवर केवळ दंभाने केलेली उपासना ‘तामसी’ होय.
३. भगवंतांनी गीतेत सात्त्विक, राजस आणि तामस अशी ३ प्रकारची कर्मे सांगितलेली आहेत. या तीनही उपासनांमध्ये सात्त्विक उपासना हीच सर्वांनी श्रेष्ठ मानली आहे. सर्व उपासना किंवा मंत्र सुखासाठीच आहेत.
४. उपासना करून दैव अनुकूल करणे
उपासना आणि प्रयत्न (मंत्र) यांच्या संयुक्त विद्यमाने यशाची प्राप्ती होते. कोणत्याही कारणाने प्रयत्न अल्प पडून चालत नाहीत. तुमची शारीरिक क्षमता अल्प पडते, तर कधी तुमची प्रयत्नांची दिशा चुकते. कधी मध्येच तुम्ही तुमचे प्रयत्न सोडून देता, तेव्हा उपासना चालू ठेवूनही यशाची अपेक्षा करणे, ही निवळ चुकीची गोष्ट आहे. कर्म, प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत, म्हणजे उपासनेला अजिबात महत्त्व नाही, असे म्हणता येणार नाही. उपासना करून आपणास दैव अनुकूल करून घ्यायचे असते.
(साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)