‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आणि पंजाबचे नवे सरकार यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले भाष्य !

१. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती होईल !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘द कश्मीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाने संपूर्ण देशात कमाईचा उच्चांक गाठला आहे. कश्मिरी हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार झाले, हे या चित्रपटात अतिशय चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहेत. या अत्याचारांविषयी आपण अनभिज्ञ होतो, असे नाही; पण त्यावर जेव्हा एखादा चित्रपट निघतो, तेव्हा तो सर्वसामान्य लोक पहातात. चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते. समाजात अन्याय किंवा हिंसाचार झाला असेल, तर तो निश्चितपणे बाहेर आला पाहिजे, जेणेकरून जनतेला खरे काय ते समजेल ! या चित्रपटाने अनेक उच्चांक तोडले आहेत. अलीकडे काश्मीरमध्ये बरीच शांतता आहे. आतंकवाद पुनर्जिवीत करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. येत्या काळात काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत, म्हणजे काश्मीरचे जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे.

२. पंजाबमधील अमली पदार्थांद्वारे केला जाणारा आतंकवाद नियंत्रणात आणणे, हे नवीन सरकारसाठी मोठे आव्हान !

पंजाबमध्ये भगवंत सिंह मान यांचे सरकार आले आहे. आज पंजाबसमोर अनेक प्रकारच्या सुरक्षेची आव्हाने आहेत. नवीन सरकार याकडे लक्ष देईल, अशी आशा आहे. तेथील अमली पदार्थांद्वारे केला जाणारा आतंकवाद हे सर्वांत मोठे आव्हान आहे. तेथील अनेक युवक नशेच्या आहारी गेले आहेत. त्यांना योग्य मार्गावर आणणे, हे सरकारसाठी महत्त्वाचे कार्य आहे. याखेरीज पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोनच्या साहाय्याने होणारी शस्त्रांस्त्रांची तस्करी थांबली पाहिजे. तसेच तेथे खलिस्तानच्या कारवायांवरही नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. युक्रेन जगाला ३० टक्के गहू पुरवतो. या पुरवठ्यावर युद्धाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमती वाढल्या आहेत. याचा लाभ भारतीय शेतकर्‍यांना होईल. भारतात ‘बफर स्टॉक’पेक्षा (केंद्रीय साठ्यापेक्षा) ५ पट अधिक साठा आहे. आता सरकारने गहू निर्यात करण्याची अनुमती दिली आहे. त्याचा पंजाबच्या शेतकर्‍यांना विशेष लाभ होईल.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.