जपानच्या पंतप्रधानांची भारत भेट
‘जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सध्या भारत दौर्यावर आले आहेत. कोरोनाचा काळ निवळल्यानंतर एका मोठ्या राष्ट्रप्रमुखाने भारताला दिलेली ही पहिली भेट आहे. जपानच्या पंतप्रधानांसाठीही ही भेट महत्त्वाची आहे. त्यांना भारतात यावेसे वाटले; कारण आज भारत आणि जपान एकमेकांचे चांगले धोरणात्मक मित्र आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जपान भारतात ४२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यात दळणवळण सुविधा, ऊर्जा क्षेत्र, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र, बुलेट ट्रेन आदींचा समावेश आहे, म्हणजे भारताच्या प्रगतीसाठी जपान थेट विदेशी गुंतवणूक करत आहे. अर्थात् या गुंतवणुकीतून जपानलाही परतावा मिळणार आहे. या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा या दोघांमध्ये काही करार झाले आहेत.
भारताचे जपानशी सैनिकी सहकार्य वाढत आहे. चतुर्भूज सहकार्यामध्ये (चार देशांची संयुक्त कृती) जपान भारतासमवेत आहे. भारताचे आणि जपानचे नौदल यांच्यात संयुक्त सराव झाला आहे. येणार्या काळात भारताचा हवाई दल त्यांच्या हवाई दलाशी संयुक्त अभ्यास करणार आहे. जपानकडे असलेल्या शस्त्रांची भारतात निर्मिती करण्याविषयी चर्चा चालू आहे. विशेषत: जहाज निर्मितीच्या उद्योगामध्ये जपानचा अनुभव फार मोठा आहे. त्या दृष्टीनेही भारताचे प्रयत्न चालू आहेत. याखेरीज भारताचे जपान समवेत गुप्तहेर सहकार्य चांगले चालू आहे. ज्याप्रमाणे चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे, त्याचप्रमाणे तो जपानचाही शत्रू आहे. प्रत्येक आठवड्यात चिनी नौदल किंवा मासेमारी बोटी जपानच्या समुद्री हद्दीत येऊन घुसखोरी करत असतात. हे थांबवण्यासाठी जपान पुष्कळ प्रयत्न करत आहे. जपान आता आक्रमक झाला असून त्याने सैनिकी अंदाजपत्रक वाढवले आहे. चाणक्यांनी सहस्रो वर्षांपूर्वी सांगितले होते, ‘शत्रूचा शत्रू हा आपला चांगला मित्र असतो.’ त्यामुळे भारतासाठी एक चांगली गोष्ट आहे. भारत आणि जपान हे दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये अतिशय गतीने पुढे जात आहेत. त्यामुळे जपानच्या पंतप्रधानांची भेट एक महत्त्वाची भेट समजली पाहिजे. ज्यामुळे आपल्या देशाची आर्थिक आणि अन्य प्रगती यांमध्ये साहाय्य मिळणार आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.