लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेट दुर्मिळ औषधींसाठी प्रसिद्ध आहे. शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या बेटावरील दुर्मिळ वनौषधी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बेटाच्या संवर्धनासाठी केवळ समित्यांचे अहवाल घेऊन दप्तर बंद ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष संवर्धन आणि संगोपन यांसाठी पुढाकार घेण्यात न आल्यास इतिहासामध्ये ‘येथे दुर्मिळ वनौषधी वनस्पती होत्या…’ असे वाचण्याची वेळ लातूर जिल्हावासियांवर येण्याची शक्यता आहे. या बेटावरील वनौषधी वाढवणे, संगोपन आणि संवर्धन यांसमवेत संशोधनासाठी विशेष काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तेथील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांविषयी हा लेखप्रपंच…
संजीवनी बेटावर दुर्मिळ औषधींचा खजिना !
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटामुळे त्याची सर्वत्र वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. या बेटावर दुर्मिळ औषधींचा खजिना आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून प्रतिवर्षी सप्टेंबरमध्ये येणार्या उत्तर नक्षत्रामध्ये या बेटावर विविध आजाराने पीडित असणारे रुग्ण, तसेच वैद्य यांचे येण्याचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढलेले आहे.
वनौषधी संवर्धनाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष !
संजीवनी बेटाचे अनुमाने ३५ हेक्टर क्षेत्र आहे. अतिशय दुर्मिळ वनौषधी याठिकाणी आहेत. ‘मराठवाडा वैधानिक विकास महामंडळा’च्या वतीने वर्ष २००० मध्ये या बेटावर अभ्यासासाठी एक समिती पाठवण्यात आली होती. या समितीने काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या; मात्र त्या सर्व ‘दप्तर बंद’ झालेल्या आहेत. या ठिकाणी पूर्णवेळ कार्यालय आणि कर्मचारी नियुक्त करून बेटावरील वनौषधीचे संगोपन आणि संवर्धन यांकडे लक्ष द्यावे. वनौषधींची नर्सरी चालू करण्यात यावी. त्यामुळे या ठिकाणी असणार्या बेरोजगार युवकांना काम मिळेल. वनौषधींच्या संवर्धनासाठी सर्व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे सुचवण्यात आले होते; परंतु यासंदर्भात काहीही काम झालेले नाही.
संशोधनासाठी प्रयोगशाळा चालू करण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा !
मराठवाड्यामध्ये ‘नॅचरोपॅथी’चे केंद्र अन्यत्र कुठेही नाही. सुदैवाने वडवळ येथील संजीवनी बेटावर असणार्या वनौषधींचा उपयोग करून या ठिकाणी ‘नॅचरोपॅथी’चे केंद्र सहजपणे चालू करता येऊ शकते. त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. येथील वनौषधींवर संशोधन करण्यासाठी या ठिकाणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्यास त्याचा सर्वसामान्य जनतेस पुष्कळ लाभ होऊ शकतो. शासकीय औषधनिर्माण विभागास या बेटावरून सहजपणे कच्च्या मालाचा पुरवठा होऊ शकतो. लातूर, धाराशिव आणि नांदेड या ३ जिल्ह्यांतील आयुर्वेदिक महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन संवर्धन आणि संगोपन यांचे कार्य केल्यास महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.
औषधी बेट नेमके कोण आणि कसे जपणार ? याविषयी संभ्रम !
हे बेट वन विभागाच्या कह्यात आहे, तर बेटाच्या वरच्या भागाचा सातबारा वायरलेस विभागाच्या टॉवरसाठी चक्क नांदेड परिक्षेत्र पोलीस विभागाच्या नावे करण्यात आला आहे. बेटावरील संपूर्ण भागाचा सातबारा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे औषधी बेट नेमके कोण आणि कसे जपणार ?, याकडे कुणाचेच लक्ष नाही. यावर जिल्हा प्रशासनाने आणि वन विभाग पर्यावरण समिती जिल्हा परिषद यांनी विचारविनिमय करून योग्य नियोजन केल्यास मोठा पारंपरिक वनऔषधींचा ठेवा जपला जाईल अन्यथा तो लोप पावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– श्री. अभय मिरजकर, लातूर