गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

बाटलीबंद पाणी आणि गोमूत्र यांच्याविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आयुर्वेदामध्ये गोमूत्राला धन्वन्तरिची उपमा दिली आहे. आधुनिक शास्त्रानुसार शरिरामध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, ताम्र (तांबे) इत्यादी एकूण २४ तत्त्वे असतात. या तत्त्वांची न्यूनाधिकता झाल्यास विकार उत्पन्न होतात. गोमूत्रामध्ये या २४ तत्त्वांसह एकूण ३२ तत्त्वे असतात. गोमूत्र नियमित प्यायल्याने शरिरात या तत्त्वांचे संतुलन रहात असल्याने विकार उत्पन्न होत नाहीत, तसेच असलेले विकारही बरे होतात.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गोसंवर्धन’)

‘गोमूत्रप्राशनाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण दिले आहे. तसेच गोमातेचे आध्यात्मिक महत्त्वही येथे देत आहोत.


१. चाचणीतील निरीक्षणे

श्री. अरुण डोंगरे

या चाचणीत पुढीलप्रमाणे २ प्रयोग करण्यात आले. दोन्ही प्रयोगांसाठी बाटलीबंद पाणी (Mineral Water) उपयोगात आणले गेले. पहिल्या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांना बाटलीबंद पाणी पिण्यास सांगितले. त्यांनी बाटलीबंद पाणी पिण्यापूर्वी आणि प्यायल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

दुसर्‍या प्रयोगात बाटलीबंद पाण्यामध्ये गोमूत्राचे (सनातन-निर्मित गोअर्काचे) ३ थेंब मिसळून ते पाणी पिण्यापूर्वी आणि प्यायल्यानंतर त्या दोन्ही साधकांची पुन्हा एकदा निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. बाटलीबंद पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे; पण त्याने गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेत घट होणे : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. त्याने बाटलीबंद पाणी प्यायल्यावर त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली; पण त्याने गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेत घट झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

१ आ. बाटलीबंद पाणी प्यायल्यावर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत घट होणे; पण त्याने गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२ अ. बाटलीबंद पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे, तसेच आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत घट होणे, यांमागील शास्त्र : सध्याच्या कलियुगातील वातावरणात रज-तमाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती, वास्तू आणि वस्तू यांवर नकारात्मक स्पंदनांचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. चाचणीतील बाटलीबंद पाणी भौतिकदृष्ट्या शुद्ध समजले जात असले, तरी ते रज-तमप्रधान वातावरणाच्या संपर्कात आल्याने त्या पाण्यात नकारात्मक स्पंदने असू शकतात. बाटलीबंद पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे, तसेच आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत घट होणे, हे ते पाणी नकारात्मक स्पंदनांनी भारित असल्याचे द्योतक आहे.

२ आ. गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जेत घट होणे, तसेच आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे, यांमागील शास्त्र : चाचणीतील दोन्ही साधकांना बाटलीबंद पाण्यात ३ थेंब गोमूत्र मिसळून ते पाणी पिण्यास दिले. तेव्हा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जेत घट झाली आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण गोमूत्रातील सात्त्विकतेमुळे बाटलीबंद पाण्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन ते पाणी खर्‍या अर्थाने शुद्ध आणि सात्त्विक झाले. गोमूत्रातील सात्त्विकतेमुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या देहाभोवती असलेल्या नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून (कमी) झाले, तर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

३. निष्कर्ष

पाण्यावर प्रक्रिया करून त्यातील जंतू आणि आरोग्यास हानीकारक घटक काढले, तरी त्या पाण्यात चैतन्य निर्माण करणे विज्ञानाला शक्य नाही; मात्र त्या पाण्यात गोमूत्राचे काही थेंब मिसळले, तर ते पाणी खर्‍या अर्थाने शुद्ध अन् पवित्र होऊन त्या पाण्यामुळे आध्यात्मिक लाभ होतात, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– श्री. अरुण डोंगरे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.१२.२०१८)

ई-मेल : [email protected]

आधुनिक वैद्यकशास्त्राने (ॲलोपॅथीने) असाध्य मानलेले विकारही गोमूत्राने बरे होऊ शकणे

‘सर्व प्रकारच्या मूत्रांमध्ये गोमूत्र अधिक गुणयुक्त मानले गेले आहे. गोमूत्रामुळे शरिरावरील सूज उतरते. गोमूत्र हे त्वचारोगांवरील फार मोठे औषध आहे. यकृत (लिव्हर) आणि प्लीहा (स्प्लीन) वाढल्यास गोमूत्र प्यायल्याने आणि त्याचा पोटावर शेक दिल्याने लाभ होतो. गोमूत्राद्वारे कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, ‘थायरॉयड’ ग्रंथीचे विकार, दमा यांसारखे ॲलोपॅथीने असाध्य मानलेले विकार बरे होऊ शकतात. गोमूत्रामुळे रक्तातील पांढर्‍या पेशींचे संतुलन राखले जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गोमूत्रातील ‘यूरिया’ कृमीनाशक असते.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गोसंवर्धन’)

भारतियांनो, गोमातेचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !

सौ. मधुरा कर्वे

‘गोमाता सात्त्विक असते. हिंदु धर्मात गायीला मातेचे स्थान दिले आहे. तिचे पूजन केले जाते. गोमातेमध्ये देवतांची तत्त्वे आकृष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तिचे दूध, गोमूत्र आणि गोमय (शेण) यांमध्ये ती सात्त्विकता येते. गोमूत्राने वास्तूशुद्धी केली असता वास्तूतील नकारात्मक स्पंदनांचे उच्चाटन होते. गोमयाने भूमी सारवली असता भूमीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होतात. गोमातेचे दूध म्हणजे जणूकाही अमृतच ! गोमातेचे महत्त्व ठाऊक असल्याने आपले पूर्वज आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगले. याउलट गोमाता, गोमातेचे दूध, गोमूत्र आणि गोमय यांपासून फारकत घेतल्याने आजच्या विज्ञानयुगातील पिढी खर्‍या आध्यात्मिक संपदेपासून वंचित राहिली, हे भारतियांचे दुर्दैवच !’